LIVE UPDATES

आमदार निलेश राणेंच्या पाठपुराव्याला मोठं यश

कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना 79 कोटींची मदत
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 26, 2026 12:54 PM
views 101  views

  • संजय वेंगुर्लेकर यांनी व्यक्त केले आभार

कुडाळ : मार्च, एप्रिल आणि मे २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात गुरुवारी सभागृहात बागायतदारांचे प्रश्न आक्रमकपणे मांडले. त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अवघ्या १२ तासांत यश आले असून, शासनाने प्रति हेक्टरी २२,५०० रुपयांची मदत जाहीर केली आहे.

या ऐतिहासिक निर्णयाबद्दल भाजपा कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी भारतीय जनता पार्टी कुडाळच्या वतीने खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांचे विशेष आभार मानले आहेत.

बातमीदारांशी बोलताना भाजपा कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी या निर्णयाचे स्वागत करत राणे कुटुंबीयांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. वेंगुर्लेकर म्हणाले की, "२०१३ नंतर आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेली ही अशा प्रकारची पहिलीच मोठी आणि जलद नुकसानभरपाई आहे. आमदार निलेश राणे नेहमीच सभागृहात कोकणातील विविध प्रश्न अत्यंत अभ्यासू आणि आक्रमक पद्धतीने मांडत असतात व तेवढ्याच गतीने ते मार्गीही लावतात. अवघ्या काही तासांत शेतकऱ्यांसाठी ही मदत जाहीर करून त्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे."

संजय वेंगुर्लेकर यांनी पुढे विश्वास व्यक्त केला की, "आम्हाला निलेश राणे यांच्यासारखा अभ्यासू व आक्रमक आमदार लाभला हे आमचे भाग्य आहे. त्यांच्या तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आणि आमचे लाडके नेते खासदार नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ-मालवण मतदार संघ एका वेगळ्या उंचीवर जाईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे." 

आमदार निलेश राणे यांनी सभागृहात मांडलेल्या प्रश्नावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तत्काळ कार्यवाहीचा शब्द दिला होता. त्यानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून अवघ्या १२ तासांत शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील एकूण ३३४ कोटी ९८ लक्ष रुपयांच्या मंजुरीपैकी, कोकण विभागातील आंबा आणि काजू नुकसानीसाठी २०९ कोटी १० लक्ष रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.

याअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४२ हजार ३२२ शेतकऱ्यांना एकूण ७९ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे. यात कुडाळ व मालवण तालुक्याला खालीलप्रमाणे निधी जाहीर झाला आहे:

 कुडाळ तालुका: ७,७५१ शेतकऱ्यांना १२ कोटी ५७ लाख रुपये, मालवण तालुका: ७,४२९ शेतकऱ्यांना ११ कोटी २२ लक्ष रुपये 

 शासकीय मदतीव्यतिरिक्त, विमा कंपन्यांकडूनही शेतकऱ्यांना हक्काची नुकसानभरपाई मिळावी यासाठी आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचा पाठपुरावा सातत्याने सुरू असल्याचेही संजय वेंगुर्लेकर यांनी या वेळी नमूद केले.