
आ. निलेश राणेंची स्फोटक प्रेस
सिंधुदुर्ग : पोलीस अधिक्षक मोहन दहीकर यांच्या काळात अवैद्य धंद्यांनी डोकं वर काढलं आहे. गोवा बनवटीची दारू सिंधुदुर्गातून रत्नागिरीत जिल्ह्यात जाते. राजापुरात कारवाई होते, मग सिंधुदुर्गात कारवाई का होत नाही ? दोन नंबर धंदे वाल्यांकडून दोन ते अडीच कोटी रुपये घेतले जातात असा गंभीर आरोप करत आमदार निलेश राणे खळबळ उडवून दिली आहे. दहिकरांसारखे निष्क्रिय आणि भ्रष्टाचारात बरबटलेल्या अधिकाऱ्यांना मी असेपर्यंत थारा नाही. दहिकरांच्या विरोधात पालकमंत्र्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे आमदार राणे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
आमदार निलेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक यांच्या कारभाराबाबत पत्रकार परिषद घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आज पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेऊन निलेश राणे यांनी पोलीस अधीक्षक दहीकर यांच्यावर गंभीर आरोप केले. निलेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या साधारण ११०० ते १२०० गुन्ह्यांची नोंद आहे. या संदर्भात पोलीस विभागाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला काही ते रजेवर गेले. “क्राईम टू पनिशमेंट” अर्थात गुन्ह्यांपासून शिक्षेपर्यंत पोहोचण्याचा दर चिंताजनक असल्याचे सांगत त्यांनी मागील दीड वर्षांतील कन्विक्शन रेट २० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचा आरोप केला. जेव्हा पोलीस विभागाचा प्रमुखच निष्क्रिय असतो, तेव्हा संपूर्ण यंत्रणेवर त्याचा परिणाम होतो. वरचा अधिकारी ठरवतो की विभाग कसा चालवायचा. त्यामुळे गुन्हेगारांवर कारवाई आणि शिक्षा होण्याचे प्रमाण कमी होत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारूचे रॅकेट सुरू असल्याचाही गंभीर आरोप राणे यांनी केला. “गावागावांत बनावट दारूचा व्यवसाय सुरू असून त्याचा सर्वाधिक फटका तरुण वर्गाला बसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे गोवा बनवटीची दारू पकडण्यात आली. ही दारू सिंधदुर्गातूनच पुढे गेली. मग सिंधुदुर्गात कारवाई का नाही झाली ? सिंधुदुर्गात फक्त छपरी मुलांना पकडून कारवाईचा दिखावूपणा करण्यात आला. दहा बारा लोकांवर कारवाई केल्याचे दाखवायचे, मात्र या सगळ्यामागचा मुख्य सूत्रधार कोण, दारूचा पुरवठा कोण करतो, माल समुद्रमार्गे येतो की घाटमार्गे, याचा शोध मागील दीड वर्षांत लागलेला नाही.
“पोलिसांनी आजवर एखादा मोठा सप्लायर पकडला आहे का? असा एकही सूत्रधार सापडला नाही की ज्याला पकडल्यावर संपूर्ण रॅकेट बंद होईल. फक्त किरकोळ कारवाई करून ‘आम्ही काम करतोय’ असे दाखवले जात आहे,” असा आरोपही राणे यांनी केला.
कुडाळमध्ये बिफ विकलं जात. त्याने तर कटरच आणलेला आहे. पोलीस अधीक्षक त्याच्यावर कारवाई करायला तयार नाही. संघ परिवाराची माणसं मला रोज सांगत असतात. त्यांचे रेकॉर्डिंग पाठवतात. हिंदूंना त्रास होतोय, त्याच्या तक्रारी होतात पण पोलीस दुर्लक्ष करतात. गो मातेची गाडी पोलिसांनी पकडली अशी कुठे घटनाचं घडली नाही. आजपर्यंत गोरक्षकांनीच गाड्या पकडल्या. कायद्याची प्रभावी अंमलबजावणीच झाली नाही. आज सिंधुदुर्ग पोलीस दलात अनेक पदे रिक्त आहेत. ती पदे भरण्याची जबाबदारी कोणाची ? दोडामार्ग मध्ये रबर प्लांटेशनच्या नावाखाली परप्रांतीय लोक गांजा उगवतायत. ड्रॅग्ज उगवले जातायत. मग पोलीस अधीक्षकांना दोडामार्गमध्ये जाऊन कारवाई करण्याचे सुचले नाही ?
मटका, दारू, जुगार, तस्करी यासह सर्व दोन नंबर धंद्यांकडून पोलिसांचे कलेक्शन सुरु आहे. महिन्याला दोन ते सवा दोन कोटी जमवले जातात. पोलीस खात्याबाबत आपला आक्षेप नसून फक्त निष्क्रिय पोलीस अधीक्षक दहिकर यांच्यावर आहे. दहिकर यांच्यासारखे अधिकारी असतील तर सरकार बदनाम होईल. असे अधिकारी पोलीस दलातच असता नये यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही जाहीर केले. आजपर्यंत रस्त्यावर उतरून कुठे रस्त्यावर उतरून कारवाई केली असं कधी झालं नाही. पूर्वीचे पोलीस अधीक्षक प्रसन्न यांचा एक रुबाब होता. रोखठोक वागायचे. अवैध धंदे कंट्रोलमध्ये आणले होते. जोपर्यंत दहिकर इथून जात नाहीत तोपर्यंत पाठलाग सोडणार नाही. स्टिंग ऑपरेशन करणार, पत्रकार परिषद दर 15 दिवसांनी घेणार, पण अशा अधिकाऱ्यांना जिल्ह्यात स्वस्थ बसू देणार नाही.
पालकमंत्री स्वतः मटक्याच्या ठिकाणी जाऊन छापा मारतात हेच पोलीस अधीक्षकांचे अपयश आहे. जिल्हा दारू, गांजा, ड्रॅग्ज, मटका मुक्त झालाच पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुखमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे यांचीही हिच भूमिका आहे असेही निलेश राणे यांनी स्पष्ट केले.
आपली सुरक्षा पोलीस अधीक्षकांनी कमी केली, या माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या आरोपांना आमदार निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुरक्षा कमी-जास्त करण्याचा अधिकार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे नसून तो राज्य सरकारच्या गृह खात्याकडे असतो, एवढं अज्ञान एका दहा वर्षाच्या माजी आमदाराला आहे हे ऐकून खरं वाटलं नाही अशी टिका आमदार निलेश राणे यांनी केली.
“सुरक्षा कमी करायची, वाढवायची किंवा काढून घ्यायची याचा निर्णय जिल्ह्याच्या एसपींकडे नसतो. हा अधिकार राज्य सरकारच्या गृह खात्याकडे असतो. दहा वर्षे आमदार राहिलेल्या व्यक्तीला हे माहिती नसणे आश्चर्यकारक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर काही काळ सुरक्षा व्यवस्थेतील वाहनांमध्ये कपात करण्यात आली. पंतप्रधान स्वतः दोन गाड्यांच्या ताफ्यामध्ये फिरायला लागले. देशावरील संकट कमी होईपर्यंत सर्वांनाच हे करणे आवश्यक आहे. मागील दहा वर्षे मी कोणत्याही कॉन्स्टेबलशिवाय एकटाच फिरलो. घरात आमदार, केंद्रियमंत्री होते. तरीही मी एकटाच फिरायचो. आमदार झाल्यानंतर गृह खात्याला गरज वाटली असेल म्हणून त्यांनी सुरक्षा दिली असेल. असेही राणे यांनी स्पष्ट केले










