
लोकप्रतिनिधींसह कलमठ ग्रामस्थांचे आंदोलन
कणकवली : स्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या सक्तीच्या धोरणावरून, कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्यांवरून तसेच कलमठ गावाच्या स्वतंत्र फिडर लाईनच्या रखडलेल्या कामावरून कणकवलीत महावितरणविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. वीज ग्राहक संघटना, व्यापारी संघटना, लोकप्रतिनिधी आणि कलमठ ग्रामस्थांनी महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरत विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान, कलमठ ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर २ जूनपासून फिडर लाईनचे काम पुन्हा सुरू करण्याचे लेखी आश्वासन महावितरणकडून देण्यात आले.
येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत स्मार्ट मीटर, कमी दाबाचा वीजपुरवठा, वारंवार होणारी वीज खंडितता आणि पावसाळ्यापूर्वीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता संदीप पाटील यांनी सर्व ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याचे धोरण केंद्र सरकारचे असून मीटर बदलणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. तसेच ग्राहकांच्या उपस्थितीतच स्मार्ट मीटर बसविण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आल्याची माहिती दिली.
मात्र नगराध्यक्ष संदेश पारकर, वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकारी आणि इतर उपस्थितांनी स्मार्ट मीटर सक्तीचे नसल्याचा दावा करत महावितरणकडून चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप केला. तर कलमठ गावात २६ तास वीज नव्हती. तेवढ्या कालावधीची वीज भरपाई म्हणून वीज ग्राहकांच्या बिलात सवलत द्यावी अशीही मागणी करण्यात आली. या प्रश्नावर वीज ग्राहक संघटनेचे समन्वयक नंदन वेंगुर्लेकर आणि महावितरणचे श्री.पाटील यांच्यात खडाजंगीही झाली. अखेर या प्रश्नावर न्यायालयात दाद मागून प्रश्न सोडावावा असे श्री.पाटील म्हणाले. यानंतर सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिवे आणि अन्य सेवांमध्ये स्मार्ट मीटरमुळे बिल भरण्यास उशीर झाला की तात्काळ वीजपुरवठा खंडित होतो, त्यामुळे नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी स्मार्ट वीज मिटर सक्ती करू नको असे संदेश पारकर यांनी सांगितले. तर श्री.पाटील यांनी सर्व वीज मिटर बदलण्याचे केंद्राचे धोरण आहे. त्यामुळे टप्पाटप्प्याने सर्व मीटर बदलले जात असल्याची माहिती दिली.
कणकवली शहरासह महामार्गालगतच्या भागात कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याची समस्या व्यापारी व ग्राहकांनी मांडली. ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त भार असल्याने समस्या निर्माण होत असल्याचे अभियंता पाटील यांनी सांगितले. नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी जागेची अडचण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर महामार्ग परिसरात ट्रान्सफॉर्मर उभारण्याचा पर्याय नागरिकांनी सुचवला. तसेच नवीन कॉम्प्लेक्समध्ये दोन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा प्रस्ताव नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मांडला. या सूचनांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.
दरम्यान, आठ दिवसांपूर्वीच्या वादळी पावसानंतर अनेक गावे चार ते पाच दिवस अंधारात राहिल्याच्या मुद्द्यावर नागरिकांनी महावितरणला लक्ष्य केले. लोंबकळणाऱ्या तारा, गंजलेले खांब आणि झाडांच्या फांद्यांची छाटणी न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला. पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.
याचवेळी कलमठ गावाच्या स्वतंत्र फिडर लाईनचे काम अचानक थांबविण्यात आल्याच्या मुद्द्यावर कलमठचे लोकप्रतिनिधी आणि वीज ग्राहकांनी आक्रमक भूमिका घेतली. जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोवर कार्यालयातून आम्ही जाणार नसल्याचाही इशारा देण्यात आला. कलमठ सरपंच संदीप मेस्त्री म्हणाले की, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून कलमठसाठी स्वतंत्र फिडर लाईनचे काम मार्गी लागले आहे. आता ते अचानक बंद करून तुम्ही कलमठ ग्रामस्थांची फसवणूक करत आहात. मात्र आम्ही ठोस आश्वासनाखेरीज आंदोलन मागे घेणार नाही. यावेळी पटवर्धन चौक ते महावितरण सबस्टेशनदरम्यान अतिक्रमणामुळे काम थांबल्याचे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले. मात्र ग्रामस्थांनी पर्यायी मार्गाने काम पूर्ण करण्याची मागणी केली. अखेर पालकमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्यानंतर महावितरणने २ जूनपासून भूमिगत वीज वाहिनीचे काम पुन्हा सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.










