LIVE UPDATES

महानगर गॅसचे बिल भरण्यासाठी पोस्टाचा आधार

टपाल विभाग, गॅस कंपनीत सामंजस्य करार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 10, 2026 15:10 PM
views 25  views

रत्नागिरी : शहरातील महानगर गॅसच्या ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक सुविधा उपलब्ध झाली असून, आता शहरातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये महानगर गॅसची मासिक बिला-भरणा सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे रत्नागिरी शहरातील सुमारे १०,००० महानगर गॅस ग्राहकांना मोठा लाभ होणार आहे.

महानगर गॅसचे ग्राहक दिवसेंदिवस वाढत असून ते शहराच्या विविध भागांमध्ये वास्तव्यास आहेत. त्यामुळे विद्यमान बिल भरणा केंद्रांपर्यंत जाणे काही ग्राहकांसाठी गैरसोयीचे ठरत होते. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन महानगर गॅसने भारतीय डाक विभागाशी संपर्क साधून पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून बाबतचा प्रस्ताव सादर केला होता. भारतीय डाक विभागाचे व्यापक नेटवर्क आणि नागरिकांशी असलेले दैनंदिन संर्पकाचे नाते लक्षात घेता, या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. त्यानुसार भारतीय डाक विभाग आणि महानगर गॅस यांच्यामध्ये आज दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून, या सुविधेची अंमलबजावणी तात्काळ सुरू करण्यात आली आहे. सदर करारावर भारतीय डाक विभागाच्या वतीने डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी, आणि महानगर गॅस लिमिटेडच्या वतीने महानगर गॅस लिमिटेडचे प्रमुख आशीष प्रसाद यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

या करारामुळे रत्नागिरी शहरातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये महानगर गॅसची मासिक बिला भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामध्ये रत्नागिरी प्रधान डाकघर, रत्नागिरी कलेक्टरेट एस.ओ., शिवाजीनगर एस.ओ., एम.आय.डी.सी. (रत्नागिरी) एस.ओ. तसेच शहरातील इतर सर्व पोस्ट ऑफिसचा समावेश आहे. या सुविधेमुळे महानगर गॅसच्या ग्राहकांना आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सहजपणे मासिक बिल भरता येणार असून ग्राहकांचा वेळ व प्रवासाचा खर्च वाचणार आहे. पोस्ट ऑफिसच्या विस्तृत नेटवर्कमुळे महानगर गॅस ग्राहकांना बिल भरण्यासाठी दूरवर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे ग्राहकांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि श्रम यांची बचत होणार असून, त्यांच्या दैनंदिन व्यवहारात अधिक सुलभता निर्माण होणार आहे.

भारतीय डाक विभागामार्फत नागरिकांना स्पीड पोस्टद्वारे देश-विदेशात टपाल व राखी पाठवणे, पार्सल पिकअप सेवा, टपाल जीवन विमा, विविध बचत योजना, लॉजिस्टिक सेवा, पासपोर्ट सेवा, आधार नोंदणी व अद्ययावत करण्याची सुविधा अशा विविध नागरिक-केंद्रित सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या सुविधांमध्ये आता महानगर गॅस बिल भरणा सेवेचीही भर पडली आहे. भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजाेशी संबंधित विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना या सुविधेमुळे आणखी बळकटी मिळणार आहे.