
कुडाळ : मिरज येथून एका व्यक्तीचा खून करून फरार झालेल्या दोन इसमांना कुडाळ पोलिसांनी शिताफीने पकडून सावंतवाडी येथून पकडण्यात यश मिळवले आहे. मोबाईल लोकेशनचा वापर करून कुडाळ पोलिसांनी शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता पकडले. यानंतर या दोघांना मिरज पोलिसांच्या ताब्यात संध्याकाळी देण्यात आले आहे. कुडाळ पोलिसानी दाखवलेल्या सतर्कतेमुळे या दोन्ही संशयतांच्या अवघ्या काही तासातच मुसक्या आवळण्यात यश मिळाले आहे.
गुरुवारी मिरज येथून एका इसमाचा खून करून इब्राहिम अमीनसाब मुजावर (वय ३२, रा. मिरज-सांगली) आणि अश्फाक खान इकबाल खान पठाण (वय ४४, रा. मिरज, जि. सांगली) हे दोघे मिरज येथून फरार झाले होते. यानंतर तेथील पोलिसांनी या दोन्ही संशयित आरोपींचे मोबाईल लोकेशन घेतले असता ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळदरम्यान आढळून आले. त्यानंतर तेथील पोलिसांनी कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याशी संपर्क साधला. यानंतर कुडाळ पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत या संशयिताच करंट लोकेशन घेतले. ते सावंतवाडी येथे मिळाले.
या लोकेशनवर कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पोलीस हवालदार कृष्णा केसरकर, पोलीस हवालदार संजय कदम व रामदास गोसावी हे सर्वजण या लोकेशनवर तात्काळ गेले. यावेळी सावंतवाडी येथील खासकीलवाडा येथे या संशयतांचा शोध घेतला असता हे दोघेजण एका नवीन इमारतीचे रंगकाम करत असताना आढळून आले. कुडाळ पोलिसांनी त्याचे छायाचित्र घेत मिरज येथील पोलिसांची खात्री केली असता तेच संशयित असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्या दोघांना ताब्यात घेत कुडाळ पोलीस स्टेशन येथे आणले. यानंतर संध्याकाळी मिरज पोलीस कुडाळ पोलीस स्टेशन येथे दाखल होताच या दोघांना त्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, या दोघांनी खून केल्यानंतर सावंतवाडी येथील एका व्यक्तीला आपल्याला काम हवे असल्याचे सांगितले होते. यानंतर ते या कामाचा बहाणा करून सावंतवाडी येथे दाखल होत त्यांनी लपण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मिरज व कुडाळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्लॅन फसला आणि ते अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडले. कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम व त्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे या दोन्ही संशयतांच्या अवघ्या काही तासातच मुसक्या आवळण्यात यश मिळाले आहे.