
सावंतवाडी : शहरातील प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना दोन दिवस का उलटले ? संशयितांना अभय दिल्यानेच त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झाला. तिसऱ्या संशय आरोपी मिलिंद माने यांना अटक दाखवून नंतर मेडिकल का केली नाही ? अशा प्रश्नांचा भडिमार आज उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांवर केला. याप्रकरणी पोलिसांनी योग्य तपास करून संशयतांचा अंतरिम अटकपूर्व जामिन रद्द करण्यासाठी प्रयत्न करावेत. जामीन रद्द न झाल्यास जिल्ह्यातील शिवसेना पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकेल असा इशारा यावेळी देण्यात आला.
सावंतवाडी माठेवाडा येथील प्रिया चव्हाण या विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी तिच्या माहेरच्यांना न्याय देण्यासाठी सावंतवाडी पोलिसांकडून होणारा हलगर्जिपणा लक्षात घेता तसेच पोलीस तपासात संस्थेत आरोपींना देण्यात येणारा अभय पाहता ठाकरे शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांरी कार्यकर्त्यानी प्रिया चव्हाण यांच्या माहेरच्या व्यक्तींसमवेत सावंतवाडी पोलीस ठाण्याला शुक्रवारी धडक दिली. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या रोशाला सावंतवाडी पोलिसांना सामोरे जावे लागले. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ, सावंतवाडी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, चंद्रकांत कासार, देवगड महिला तालुकाप्रमुख हर्षा ठाकूर, कणकवली महिला तालुकाप्रमुख माधवी दळवी, दिव्या साळगावकर, संजना कोलते, भारतीय कासार, समीरा खलिल, चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, गुणाजी गावडे, निशांत तोरस्कर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावंतवाडी पोलीस ठाण्यात हाती मागण्यांचे फलक घेऊन पदाधिकाऱ्यांनी एन्ट्री करत जोरदार घोषणाबाजी केली. गृहखात सरकार विरोधात घोषणाबाजी केली. भाजप पदाधिकाऱ्यांना अभय देणाऱ्या सरकारचा निषेध असो, गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक या प्रकरणातील गुन्हा दाखल झालेल्या संशोध आरोपींच्या अंतरिम अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीला ओरोस येथे गेल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर हे मोर्चाला सामोरे गेले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नाला त्यांनी समर्पक उत्तरे न दिल्याने जोपर्यंत स्वतः पोलीस निरीक्षक या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी भूमिका सर्वांनी मांडली. उपस्थितांचा रोष लक्षात घेता कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनीही या ठिकाणी येऊन कार्यकर्त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु ते सुद्धा पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर देण्यास निवृत्तर झाले. दुपारी उशिरा पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. कांबळे व पोलीस निरीक्षक श्री चव्हाण पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर दोघेही उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना सामोरे गेले यावेळी.
माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, सतीश सावंत यांनी प्रश्नांचा भडिमार केला. यामध्ये पोलिसांनी प्रिया चव्हाण यांच्या आत्महत्या नंतर तात्काळ तपास करून संबंधितावर गुन्हा दाखल का केला नाही ? याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास दोन दिवस का लागले ? मुळात आम्हाला या प्रकरणांमध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण करायचे नव्हते. मात्र, पीडितांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी कोणाकडूनच सहकार्य होताना न दिसल्याने आम्ही यामध्ये पडलो. पोलिसांनी प्रिया चव्हाण यांच्या वृद्ध आई-वडिलांचा जबाब घेण्यासाठी तिच्या माहेरी जाणे गरजेचे असताना त्यांना सावंतवाडीमध्ये बोलावून घेतले हे चुकीचे आहे. तसेच आई-वडिलांचा जबाब घेण्याआधीच मृतदेहावर अंत्यसंस्कार कसे काय केले ? असे प्रश्न उपस्थित केले. तर या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी संशयीत आरोपींना अभय दिल्याने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी संधी मिळाली. यातील तिसरा संशयित आरोपी मिलिंद माने याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तत्काळ अटक करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता त्याला आदी मेडिकलसाठी का देण्यात आले. आमच्यावर राजकीय गुन्हे दाखल झाल्यानंतर प्रथमतः आम्हाला अटक करूनच नंतर मेडिकलसाठी बऱ्याचदा नेण्यात आले. मात्र, यामध्येच आधी मेडिकलसाठी का नेले ? यातून संशयाची सुरी पोलिसांच्या तपासावर येते. तसेच ब्लड सॅम्पल घेतल्यानंतर तात्काळ त्याचा रिपोर्ट येतो अशी नेमकी कुठली सुविधा या ठिकाणी आहे आदी प्रश्न परशुराम उपरकर यांनी उपस्थित केले. मुळात या सर्व प्रकारांमध्ये मिलिंद माने हाच मुख्य आरोपी आहे. एकूणच यामुळे पोलिसांचा तपासामध्ये हलगर्जीपणा दिसून येतो असे सतीश सावंत म्हणाले. तर याप्रकरणी संशयित आरोपी देवगड वरून सावंतवाडीत गाडीने आलेत. त्यामध्ये अन्य कोण कोण होते ? याचा तपास पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून का केले नाही ? शहरातील सीसीटीव्ही का तपासले नाहीत. तसेच आरोपींनी वापरलेली गाडी पोलिसांनी का ताब्यात घेतली नाही असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले.
उपस्थितांच्या प्रश्नाला उत्तरे त्यांना पोलीस निरीक्षक चव्हाण म्हणाले, या प्रकरणाचा तपास आम्ही आमच्या परीने पूर्णपणे पारदर्शकपणे केलेला आहे कोणालाही यामध्ये अभय देण्यात आलेला नाही. काही गोष्टी या प्रकरणातील मी जाहीरपणे उघड करू शकत नाही. मात्र, आम्ही आरोपींचा जामीन रद्द होण्यासाठी आमचे म्हणणे न्यायालयासमोर पद्धतशीरपणे मांडणार आहोत असे स्पष्ट केले. यावेळी यातील संशयित आरोपींचा जामीन अर्ज पंधरा रोजी रद्द झाल्यास आम्ही माघार घेऊ. अन्यथा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे सेना पोलीस अधिक्षक कार्यालयावर धडकणार असा इशारा उपस्थितांनी दिला.
एवढी मेडीकल सिस्टीम सावंतवाडीत आहे ?
माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे. संशयिताना का अटक झाली नाही ? एवढी मेडीकल यंत्रणा सावंतवाडीत आहे का ? की लगेच एखादा रिपोर्ट येईल असा सवाल तीची बहीण पूजा तावडे हिने केला. माझा बहीणीची बदनामी थांबवा अशी सादही पोलिसांना घातली.