
सावंतवाडी : माझी बहीण प्रिया चव्हाण हीने शिक्षणासाठी ४ लाख घेतल्याची माहिती खोटी आहे. तीच शिक्षण लग्नापूर्वीच झालं आहे. तिने ४० हजार घेतल्याची माहिती आम्हाला आहे. माझी बहीण चुकीची असती तर सोमवारी देवगडला झालेल्या बैठकीला ती गेली नसती. उगाचच माझ्या बहिणीची बदनामी नको. प्रणाली माने ही गोळ्या घेऊन नाटक करत होती. त्यामुळे बहिणीच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या प्रणाली माने, आर्य माने व मिलिंद माने या तिघांना अटक करून आम्हाला न्याय द्या अशी आर्त विनवणी आज प्रिया चव्हाणची लहान बहिण पूजा तावडे यांनी पोलिसांसमोर केली. ठाकरे शिवसेनेच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये प्रिया चव्हाण तिचे आई-वडील व दोन्ही बहिण सहभागी झाल्या होत्या. यावेळी तीने ही विनवणी केली.
सावंतवाडी पोलिस ठाण्यात आत्महत्या प्रकरणी संशयितांना पोलिस पाठिशी घालत असल्याचा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेन पोलिस ठाण्यात आंदोलन छेडल. प्रिया चव्हाणला न्याय द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. यात तक्रारदार आसणारे प्रियाचे माहेरचे सहभागी झाले होते. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी तालुका संपर्कप्रमुख रुपेश राऊळ, सावंतवाडी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा आदी उपस्थित होते.
यावेळी बहीण पूजा तावडे म्हणाल्या, पोलिसांनी यामध्ये कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता माझ्या बहिणीला न्याय द्यावा. तसेच यातील तिन्ही संशयीत आरोपींना अटक करावी. माझ्या बहिणीची उगाचच बदनामी होत असून ही बदनामी थांबली पाहिजे असे सांगितले. पोलिसांचा तपास राजकीय पक्षाच्या दबावाखाली दिसतो. आम्ही राजकारण यात आणत नाही. तुम्ही देखील आणू नका, अशा प्रवृत्ती जिल्ह्यात होऊ देता नये. त्यामुळे तावडे कुटुंबाच्या पाठीशी आम्ही आहोत. प्रिया चव्हाण हीला न्याय मिळाला पाहिजे. पोलिसांनी तपासातील त्रृटी न सुधारल्यास आम्ही आंदोलन करू. पालकमंत्री, स्थानिक आमदार अद्याप या कुटुंबाकडे गेले नाहीत. गृहखात्याची परिस्थिती पूर्णपणे ढासाळलेली आहे. संशयीत राजकिय महिलेला वाचवण्यासाठी दबाव ठेवला जातो. तसेच तिसऱ्या संशयीत आरोपीला सावंतवाडी आल्यावर पोलिस ठाण्यात येण्याआधीच हॉस्पिटलला पाठवलं गेलं. त्यामुळे गृहखात्याची परिस्थिती राज्याप्रमाणेच जिल्ह्यात आहे. पोलिसांची पथक पर्यटनासाठी देवगडला जात आहेत.पोलिस या प्रकरणी गंभीर नाही. मात्र, काही झाले तरी ठाकरे शिवसेना प्रिया चव्हाणच्या आई-वडीलांना न्याय मिळवून देणार आहे असे माजी आम. वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.
उपरकर म्हणाले, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्या व्हॉट्सअपला पालकमंत्र्यांसोबतचे असलेले फोटो अज्ञात व्यक्तीकडून पाठवण्यात आले. यातून संशयित हे पालकमंत्र्याचे सहकारी आहेत असे दाखवून आम्हाला अप्रत्यक्ष धमकावण्याचा प्रयत्न झाला. मात्र, अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. या प्रकरणातील तिसरा आरोपीचा मोबाईल ताब्यात घेऊन तो बायकोच्या पदराआडून काय करतो याचाही शोध पोलिसांनी घ्यावा. जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी म्हणाले, प्रिया चव्हाण हीच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी ठाकरे सेना प्रयत्नशिल आहे. संशय घेताना तत्काळ अटक केली असती तर अंतरीम जामीन मिळाला नसता. मात्र 15 तारीख च्या सुनावणीमध्ये जामीन रद्द न झाल्यास ठाकरे शिवसेना पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकेल असा इशारा दिला.