
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे कामकाज म्हणजे रामभरोसे झाले आहे. या ठिकाणी काम करणारे कर्मचारी जीव तोडून काम करतात. तर काहीजण मात्र केवळ पाट्या टाकण्याचे काम करत असतात. या सर्वांवर चाप बसून जिल्हा परिषदेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पावले उचलली असून, कार्यालयात वेळेत उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्यांनी कारवाईचा बडगाव उचलला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर हे कार्यालयीन कामात कठोर असून, त्यांनी बेशिस्त जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गेली तीन वर्ष जिल्हा परिषदेवर पदाधिकारी नसल्याने जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकीय चालू आहे. प्रशासनाचा प्रमुख जेवढा कार्यतत्पर असेल तेवढेच कार्य तत्पर खालील कर्मचारी असतात. मात्र गेल्या काही कालावधीपासून जिल्हा परिषदेमध्ये पूर्णपणे मरगळ आलेली आहे. यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत जनतेची कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. मात्र आता नव्याने आलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये आलेली ही मरगळ दूर करून जिल्हा परिषदेचे कामकाज सुरळीतरीत्या चालवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र या प्रयत्नांमध्ये त्यांना खूप अडचणी येऊ लागल्या आहेत.
जिल्हा परिषदेमध्ये उशिराने येणाऱ्या लेट लतिफांचीही संख्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या मुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गुरुवार १० जुलै रोजी सकाळी जिल्हा मुख्यालय कार्यालयीन उपस्थितीच्या हजेरीपटावरून आढावा घेतला असता ६ कर्मचारी कार्यालयीन वेळेत अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. याची गंभीर दखल घेत या अनुपस्थित कर्मचारी याना तत्काळ नोटीस बजावण्यात येऊन खुलासे मागविन्याय आलेले आहेत.या मुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.