
कुडाळ : पणदूर - घोडगे रस्त्यानजिक डिगस - चोरगेवाडी फाटा ते सुर्वेवाडी दरम्यान एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळण्याचा प्रयत्न एका परप्रांतीय युवकाने केला. मात्र, त्या महिलेने प्रसंगावधान राखत प्रतिकार केला. त्यानंतर तेथून पलायन केलेल्या त्या युवकाला पणदूर येथे ग्रामस्थांनी पकडून यथेच्छ चोप दिला. त्यानंतर त्याला कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले. हि घटना गुरूवारी सायं.७.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
पणदूर हून डिगस सुर्वेवाडीच्या दिशेने सायंकाळी एक महिला रस्त्याने पायी चालत जात होती. चोरगेवाडी फाटा नजिक दरम्यानच्या वेळी मागावून आलेल्या एका वीस वर्षीय युवकाने त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिलेने प्रतिकार केल्याने सुदैवाने सोन्याची चैन चोरण्याचा त्याचा प्रयत्न फसला. त्या युवकाने तिच्या हातातील किरकोळ रोख रक्कम असलेली छोटी पर्स हिसकावली. यावेळी तिने आरडाओरडला केल्याने संशयित युवक तेथून पसार झाला. स्थानिक ग्रामस्थांना याबाबत माहीती मिळताच संशयिताचा पाठलाग करीत शोधाशोध केल्यावर तो पणदूर तेथे सापडला. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी त्याला चांगलाच चोप दिला. तसेच कुडाळ पोलिसांना पाचारण करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर पुढील कारवाई केली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.