LIVE UPDATES

कुडाळ बस स्थानकात बस - कारचा अपघात

चालकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक
Edited by: कोकणसाद LIVE वृतसेवा
Published on: June 20, 2026 20:34 PM
views 153  views

कुडाळ : येथील मध्यवर्ती बस स्थानकात आज एसटी बस आणि एका कारचा किरकोळ अपघात झाला. पणजी-अक्कलकोट बस आणि गोवा पासिंगच्या वॅगनर कारमध्ये झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले असून, अपघातानंतर दोन्ही चालकांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, पणजीहून अक्कलकोटच्या दिशेने जाणारी एसटी बस (क्रमांक MH 14 MH 2757) कुडाळ बस स्थानकात प्रवेश करत होती. त्याच वेळी गोवा पासिंगची वॅगनर कार (क्रमांक GA 07 N 3466) घेऊन चालक बस डेपोतून बाहेर पडत होता. या दरम्यान दोन्ही वाहने एकमेकांना घासल्याने हा अपघात घडला.

अपघात होताच कार चालक आणि एसटी बस चालक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू झाली. बस स्थानकाच्या आवारातच हा प्रकार घडल्याने पाहता-पाहता घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमा झाली होती. या अपघातात एसटी बसचे नुकसान झाले असून, झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी बस चालकाकडून करण्यात आली आहे. या घटनेमुळे बस स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.