LIVE UPDATES

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकांसह गणवेश

जि. प. उपाध्यक्ष दादा साईल यांच्याकडून शाळांना भेटी
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: June 15, 2026 14:01 PM
views 410  views

कुडाळ : महाराष्ट्र शासन आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पहिल्याच दिवशी या नवीन वस्तू हातात मिळाल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह द्विगुणित झाला आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा साईल यांनी केले. कुडाळ तालुक्यातील विविध शाळांना 'जिल्हा परिषद शाळा प्रथम दिन' म्हणून दादा साईल यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. या दौऱ्यात त्यांनी खालील शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले व संवाद साधला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पणदूर नं. २,  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पावशी नं. १, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पणदूर नं. १, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अणाव परबवाडी-वेशीवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अणाव नं. १, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अणाव दाबाचीवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पणदूर नं. १ येथे भेटीदरम्यान बोलताना उपाध्यक्ष दादा साईल म्हणाले, "शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या हातात पाठ्यपुस्तके आणि गणवेश दिल्याबद्दल मी महाराष्ट्र सरकार व जिल्हा परिषदेचे मनापासून अभिनंदन करतो. या नवीन वस्तूंमुळे मुलांची मने सुखावल्याचे स्पष्ट जाणवत आहे.

पुढे बोलताना त्यांनी ग्वाही दिली की, "शाळेचा शैक्षणिक आलेख उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व भौतिक सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य या नात्याने आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू. मुलांच्या सुप्त गुणांना, विशेषतः क्रीडा प्रकारांना वाव देण्यासाठी आमचे विशेष प्रयत्न राहतील. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांमध्ये कमालीचा उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता. पटसंख्या वाढीच्या दृष्टीने जिल्हा परिषद शाळांमध्ये आता सकारात्मक चित्र निर्माण होत असून, ही आकडेवारी सध्या कमी असली तरी ही एक चांगली सुरुवात आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. मुलांना डिजिटल वर्ग व इतर अद्ययावत सोयी-सुविधा पुरवून त्यांचे शिक्षण अधिक सुलभ करण्यासाठी प्रशासन नक्कीच प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, शाळेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या पहिलीच्या चिमुरड्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. एखाद्या नवीन गृहप्रवेशाप्रमाणे त्यांच्या पाऊलखुणा (रंगामध्ये पावले उमटवून) घेण्यात आल्या, ज्यामुळे मुलांचा पहिला दिवस संस्मरणीय ठरला.

या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य संगीता साईल, मुख्याध्यापक संतोष जाधव, शिक्षिका प्राजक्ता राणे, उपशिक्षक मनीषा परुळेकर, उपशिक्षक रिया आळवेकर उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भीवा चव्हाण, उपाध्यक्ष साक्षी साईल, अंगणवाडी सेविका रेश्मा पणदूरकर, अंगणवाडी मदतनीस अनुष्का जाधव, पणदूरचे आरोग्य निरीक्षक यशवंत श्रीपाद आरोसकर, स्थानिक आरोग्य सेविका आणि  ग्रामस्थ उपस्थित होते.