LIVE UPDATES

कुडाळ मैदानाची दुरवस्था थांबवण्यासाठी शिवसेना सरसावली

४ जून रोजी भव्य 'स्वच्छता मोहीम'
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: May 31, 2026 20:16 PM
views 19  views

कुडाळ : कुडाळ शहरातील तहसीलदार कार्यालयाशेजारील शासकीय क्रीडा मैदानावर सध्या मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे. हे मैदान मद्यपींचा अड्डा बनले असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. क्रीडाप्रेमी आणि सुजाण नागरिकांच्या याच तीव्र भावना लक्षात घेऊन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेना कुडाळ शहराच्या वतीने या मैदानावर भव्य 'स्वच्छता मोहीम' राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या पुढाकाराने गुरुवार, दिनांक ४ जून २०२६ रोजी सकाळी ठीक ७:३० वाजता या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

कोकणसाद वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, या शासकीय क्रीडा मैदानाची प्रचंड दुरवस्था झाली असून तिथे दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. 'मैदानावर नशा' आणि 'तळीरामांचा अड्डा' अशी या क्रीडा मैदानाची नवी आणि क्लेशदायक ओळख निर्माण झाली आहे. यामुळे स्थानिक खेळाडू आणि नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि खेळाडूंना त्यांचे मैदान पुन्हा सुरक्षित, स्वच्छ व सुंदर स्वरूपात मिळवून देण्यासाठी शिवसेनेने हे आक्रमक पाऊल उचलले आहे.

या मोहिमेबाबत बोलताना शिवसेना व युवासेना कुडाळ शहराच्या वतीने सांगण्यात आले की, "कुडाळ शहरातील सर्व सुजाण नागरिक, क्रीडाप्रेमी, तरुण आणि महिलांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आपल्या शहराचे वैभव असलेले हे मैदान स्वच्छ आणि सुंदर ठेवणे हे आपले सर्वांचे सामूहिक कर्तव्य आहे. त्यामुळे या श्रमदानात सर्वांनी आपले बहुमूल्य योगदान द्यावे." मैदानाला पुन्हा एकदा खेळाडूंच्या ऊर्जेने आणि आरोग्याने सुसज्ज करण्यासाठी आयोजित केलेल्या या मोहिमेला कुडाळवासीयांकडून मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.