सिंधू सरस व मिनी सरसचे दिमाखदार उद्घाटन

कोल्हापूरच्या मॉलपेक्षा आपल्या ग्रामीण उत्पादनांना पसंती द्या | पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन.
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 21, 2026 17:39 PM
views 144  views

कुडाळ : ग्रामीण भागातील महिलांच्या कष्टाला आणि जिद्दीला हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘सिंधू सरस’ व ‘मिनी सरस २०२५-२६’ प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते आज पार पडले. जिल्हा परिषद आणि 'उमेद' अभियानाच्या माध्यमातून आयोजित या सोहळ्यात मान्यवरांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचा निर्धार व्यक्त केला.

याप्रसंगी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सांगितले की, २०१६ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत आज जिल्ह्यातील १ लाख महिला जोडल्या गेल्या आहेत. "विविध योजनांच्या माध्यमातून बचत गटांना आतापर्यंत ८५० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून, केवळ २०२५ या वर्षात १५० कोटींचे वितरण झाले आहे," असे त्यांनी नमूद केले. वाढत्या उन्हामुळे उपस्थितीवर मर्यादा आल्या असल्या, तरी जिल्हा परिषद महिलांच्या विकासासाठी पूर्ण क्षमतेने काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी 'उमेद' महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे कौतुक केले. "निवडणुकांमुळे हा उपक्रम यंदा उशिरा घ्यावा लागला. या व्यासपीठामुळे महिलांच्या उत्पादनांची ओळख जगाला होते. सिंधुदुर्गच्या नागरिकांनी या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी," असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी हा केवळ कार्यक्रम नसून ग्रामीण महिलांच्या कष्टाचा उत्सव असल्याचे सांगितले. "छत्रपती शिवाजी महाराजांची स्वावलंबनाची परंपरा आज आपल्या भगिनी 'चूल आणि मूला'च्या चाकोरीतून बाहेर पडत पुढे नेत आहेत. मॉलच्या चकाकीपेक्षा गावात उत्पादित होणाऱ्या वस्तू अधिक दर्जेदार आहेत," असे सांगत त्यांनी प्रत्येक स्टॉलमधील महिलांच्या स्वप्नांना पाठबळ देण्याचे आवाहन केले.

पालकमंत्री नितेश राणे यांनी आयोजनाचे कौतुक करतानाच काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. ते म्हणाले, "सिंधुदुर्गचा विकास हा थेट महिलांच्या सक्षमीकरणाशी निगडित आहे. आपल्या माता-भगिनींच्या उद्योगात आज ५ कामगार असतील, तर ते १५ कसे होतील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे."

स्थानिक अर्थकारणावर भर :

कोल्हापूरच्या डी-मार्टमध्ये जाऊन खरेदी करण्यापेक्षा आपल्याच जिल्ह्यातील दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याकडे कल वाढवावा, जेणेकरून ग्रामीण अर्थकारण सुधारेल. उद्योगांच्या वाढीसाठी जिल्हा बँक व जिल्हा परिषद कायम पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रशासनाचे टोचले कान :

केवळ कार्यक्रम करून न थांबता, यातून महिलांची खरोखर किती प्रगती झाली याचे 'मोजमाप' होणे गरजेचे असल्याचे सांगत पालकमंत्र्यांनी प्रशासनाचे कान टोचले. पुढच्या वर्षी प्रदर्शनात काय सुधारणा करता येतील आणि बाजारपेठ अजून मोठी कशी होईल, यासाठी बैठका घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कार्यक्रमाला येण्यास विलंब झाल्याबद्दल त्यांनी जनतेची दिलगिरीही व्यक्त केली.

या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत,उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, माजी आमदार अजित गोगटे, कुडाळ सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सीताराम तेली, सदस्य दिपक नारकर, दिपलक्ष्मी पडते,नागेश आईर, रुपेश कानडे, प्राजक्ता शिरवलकर, संध्या तेरसे  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, प्रकल्प संचालक उदय पाटील,उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, कुडाळ गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर,मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, वेगुर्ला गटविकास अधिकारी व्हि. एम. नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.