चढला उन्हाचा पारा

सिंधू सरसमध्ये स्टॉलधारकांना मिळेना वारा !
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 21, 2026 19:02 PM
views 62  views

कुडाळ  :  कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या पटांगणावर ‘सिंधू सरस’ प्रदर्शनाचे दिमाखदार उद्घाटन झाले खरे, मात्र पहिल्याच दिवशी नियोजनातील मोठ्या त्रुटी समोर आल्या आहेत. मार्च महिन्यातील रणरणत्या उन्हात आयोजित या प्रदर्शनात स्टॉलधारकांसाठी लावलेले पंखे चक्क १५ फुटांपेक्षा जास्त उंचीवर असल्याने, खाली बसलेल्या महिला भगिनींना प्रचंड उकाड्याचा आणि 'भट्टी'चा सामना करावा लागत आहे.

जिल्ह्यातील शेकडो बचत गट आणि लघुउद्योजकांनी मोठ्या आशेने या प्रदर्शनात आपले स्टॉल लावले आहेत. भव्य मंडप उभारताना छताची उंची प्रमाणापेक्षा जास्त ठेवण्यात आली आहे. मात्र, या छताला लावलेले पंखे इतक्या उंचावर आहेत की, त्यांची हवा खाली स्टॉलपर्यंत पोहोचतच नाही. कोकणातील मार्च महिन्यातील आर्द्रता आणि वाढता पारा पाहता, स्टॉलमध्ये थांबणे महिलांसाठी जिकिरीचे झाले आहे.

कार्यक्रमाचे मार्चमधील नियोजन पाहता, प्रशासनाने स्टॉलच्या ठिकाणी खालच्या स्तरावर पेडेस्टल फॅन (उभे पंखे) किंवा कुलरची व्यवस्था करणे अनिवार्य होते. अद्याप प्रदर्शनाचे अनेक दिवस बाकी असताना, स्टॉलधारकांचे आरोग्य आणि सोय लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ अतिरिक्त पंख्यांची सोय करावी, अन्यथा या गर्मीचा मोठा फटका प्रदर्शनाच्या यशावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.