आरामबसमधील प्रवाशाचा अडीच लाखांचा कॅमेरा चोरी करणारा सराईत चोरटा दिल्लीत जेरबंद

वैभववाडी पोलीसांनी कारवाई
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 21, 2026 18:20 PM
views 61  views

वैभववाडी : गोवा ते करुळ दरम्यान आरामबसचा पाठलाग करून प्रवाशाचा अडीच लाख रुपयांचा महागडा कॅमेरा चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला वैभववाडी पोलिसांनी अखेर दिल्ली येथे अटक केली. कमल कुमार मुकुंदलाल रेलहन (वय ४०, रा. फरीदाबाद, हरियाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.या प्रकरणातील चोरी ३१ जानेवारी रोजी झाली होती. गोवा येथून निघालेल्या आरामबसचा आरोपीने आधीपासूनच पाठलाग केला होता. गोव्यातील बसस्थानकावर त्याने रेकी करत असताना एका पर्यटकाकडे महागडा कॅमेरा असल्याचे त्याच्या लक्षात आले. संबंधित पर्यटक बसमध्ये बसून निघाल्यानंतर आरोपीने त्या बसचा गोवा ते करुळपर्यंत पाठलाग केला.

करुळ येथे बस जेवणासाठी थांबली असताना आरोपीने संधी साधून बसमध्ये प्रवेश केला आणि पर्यटकाच्या बॅगमधील कॅमेरा लंपास केला. चोरीचा प्रकार लक्षात येताच पर्यटकाने वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत दिल्ली येथे त्याला १९मार्चला अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव, हरिश्चंद्र जायभाय, राहुल तळसकर आणि दुभाषी अमीन शेख यांनी केली.

दरम्यान, आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याने यापूर्वी पुणे व मुंबईतील मुलुंड येथे लॅपटॉप, टॅब आदी महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी केली आहे.तसेच दिल्ली व उत्तर प्रदेशमध्येही त्याच्यावर गुन्हे नोंद आहेत. तो महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची रेकी करून चोरी करण्याची पद्धत अवलंबत असल्याचे तपासात समोर आले आहे. संशयित आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.