
कुडाळ : जिल्ह्यातील पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल व्यावसायिकांवर ओढवलेल्या संकटाची दखल घेत, पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आज त्रिपक्षीय गॅस कंपन्यांच्या समन्वयकांची तातडीची आढावा बैठक घेतली. "व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल बंद पडणे जिल्ह्याच्या पर्यटनासाठी घातक असून, हा प्रश्न सोडवण्यासाठी शासन स्तरावर तातडीने पाठपुरावा केला जाईल," अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
गॅस टंचाईचा पर्यटन व्यवसायाला फटका
जिल्ह्यात सध्या BPCL, IOCL आणि HPCL या तिन्ही कंपन्यांच्या गॅस पुरवठ्यात अनियमितता निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका स्थानिक हॉटेल आणि व्यापारी वर्गाला बसत असून, अनेक ठिकाणचे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या गंभीर समस्येवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत हॉटेल व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपल्या समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी तिन्ही गॅस कंपन्यांच्या समन्वयकांना पुरवठा सुरळीत करण्याबाबत कडक सूचना दिल्या. बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सहारे उपस्थित होते. प्रशासनाशी सतत संवाद ठेवण्यासाठी व्यापारी संघटनांनी आपले स्वतंत्र प्रतिनिधी नियुक्त करावेत, जेणेकरून समन्वय साधणे सोपे होईल, असेही पालकमंत्र्यांनी सुचवले.
"व्यावसायिक गॅसचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मात्र, या काळात हॉटेल चालकांनी संयम बाळगून काम करावे. नागरिकांमध्ये कोणताही गैरसमज किंवा असंतोष निर्माण होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी," असे आवाहन ना. नितेश राणे यांनी यावेळी केले.
या बैठकीमुळे गॅस टंचाईने होरपळणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.










