महामार्गानजिक उभ्या ट्रॅक्टरला कारची धडक

दोन्ही वाहनांचे नुकसान | कार चालकासह तिघे किरकोळ जखमी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 21, 2026 19:46 PM
views 35  views

कणकवली : टायर पंचर झाल्याने दुरुस्तीसाठी महामार्गानजीक पार्किंग जागेत थांबलेल्या ट्रॅक्टरला मालवणहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची धडक बसली. नांदगाव पावाचीवाडी येथे शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात ट्रॅक्टर व कारचे बरेच नुकसान झाले. तर कारचालक सागर पोपट शिंदे (४०, रा. पुणे याच्यासह त्यांची पत्नी व मुलगा यांना किरकोळ दुखापती झाल्या. जखमींना कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

वैभव संतोष रावराणे (२६, लोरे नंबर १ - शिवगंगावाडी) हे ट्रॅक्टर घेऊन कणकवली येथून लोरे येथे निघाले होते. वाटेत नांदगाव येथे ट्रॅक्टरची चाके पंक्चर झाल्याने त्यांनी 'यू टर्न' घेत ट्रॅक्टर गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पार्किंगच्या जागेत उभा केला. तिथून ते मेकॅनिकल शोधायला गेले. याच दरम्याने पुण्याहून मालवणला जात असलेल्या, सागर शिंदे चालवत असलेल्या कारची ट्रॅक्टरला धडक बसली. अपघातात ट्रॅक्टरचे पुढील दोन्ही टायर निखळले व इंजिनचेही नुकसान झाले. तर कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. याबाबत वैभव रावराणे यांच्या फिर्यादीनुसार हलगर्जीपणे वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी सागर शिंदे याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.