
कुडाळ : सावरवाड येथे गेल्या पाच वर्षांपासून स्थापित असलेल्या ‘निर्वाण स्फटिक शिवलिंग’ देवस्थान व तेथे चालणाऱ्या आध्यात्मिक उपक्रमांबाबत काही व्यक्तींमार्फत चुकीचे गैरसमज पसरवले जात असल्याची भूमिका रुद्रनाथ फाउंडेशनचे चंद्रशेखर राणे (रुद्रराज) यांनी स्पष्ट केली आहे. हे केंद्र पूर्णतः अधिकृत असून येथे केवळ योग, ध्यान व समाजसेवेचे उपक्रम राबवले जातात, असा स्पष्ट खुलासा त्यांनी केला आहे. याबाबत रुद्रराज म्हणाले की, हे ठिकाण ‘यज्ञ मंडप’ स्वरूपात कार्यरत असून येथे येणाऱ्या भाविकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. गेल्या पाच वर्षांपासून येथे नि:शुल्क क्रिया योग व ध्यान साधनेचे धडे दिले जात आहेत.
“येथे अघोर विद्या चालते, असा आरोप करणाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन खात्री करावी. आमच्या केंद्राला कोणतेही कुलूप नसते आणि संपूर्ण परिसर सीसीटीव्ही निगराणीखाली आहे,” असेही त्यांनी नमूद केलं आहे. काही मोजक्याच व्यक्तींकडून त्रास होतं असल्याचा उल्लेख करताना ते म्हणाले की, सावरवाडीतील नागरिक महाशिवरात्र व त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी करतात. नुकत्याच पार पडलेल्या महाशिवरात्रीला सुमारे ३० हजार भाविकांनी दर्शन घेतले, तर ५ हजार जणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी २०० ते २५० स्थानिक स्वयंसेवक कार्यरत होते, जे स्थानिकच होते,अशी माहिती त्यांनी दिली.
तर यज्ञासाठी वापरली जाणारी सामग्री ५० ते ६० प्रकारच्या औषधी वनस्पतींपासून तयार केलेली असतें . तसेच भस्म गावातील युवकांनी शेणी जाळून तयार केलेले असते. येथे वेदमंत्र, पंचसूक्त व रुद्राष्टक यांचे मार्गदर्शन करून साधकांमध्ये शांतता व एकाग्रता जोपासली जाते, असेही त्यांनी सांगितले.
स्वतःच्या पार्श्वभूमीबाबत बोलताना रुद्रराज यांनी सांगितले की, ते अहमदाबाद येथील NID चे पदवीधर असून स्वामी चिन्मयानंद यांच्या गीतेवरील व्याख्यानांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. “मी केवळ योग प्रचारक आहे, कोणताही बाबा नाही. आमची संस्था नोंदणीकृत ट्रस्ट असून येथे कोणतेही आर्थिक व्यवहार चालत नाहीत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“ज्यांना काही शंका अथवा आक्षेप असतील, त्यांनी आमच्याशी थेट संवाद साधावा. हे गावचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे चुकीच्या अफवा पसरवून गावातील शांतता भंग करू नये,” असे आवाहन चंद्रशेखर राणे (रुद्रराज), रुद्रनाथ फाउंडेशन यांनी केले आहे.











