LIVE UPDATES

कोकणकन्या ९ तास उशिरा; प्रवाशांचे प्रचंड हाल

आदल्या दिवशी मांडवी एक्स्प्रेसमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाचा रेल्वे वाहतुकीला फटका
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 27, 2026 17:56 PM
views 121  views

कुडाळ : कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून मडगावकडे जाणाऱ्या गाडी क्रमांक २०१११ 'कोकणकन्या एक्सप्रेस' कुडाळ रेल्वेस्थानकावर नेहमीच्या वेळेनुसार सकाळी ८ वाजून २४ मिनिटांनी दाखल होणारी ही गाडी तब्बल ९ तास उशिराने, संध्याकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास स्थानकात पोहोचली. या प्रचंड विलंबामुळे कुडाळ स्थानकावर प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले, ज्यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या संपूर्ण विलंबामागे काल शुक्रवार, २६ जून रोजी मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या 'मांडवी एक्सप्रेस'मध्ये झालेला तांत्रिक बिघाड कारणीभूत ठरल्याची माहिती समोर येत आहे. शुक्रवार सकाळी ७:०५ वाजता मुंबईतून सुटलेल्या मांडवी एक्सप्रेसच्या 'थर्ड इकॉनॉमी एसी' डब्यांतील वातानुकूलन (AC) यंत्रणा खेड स्थानकापासूनच अचानक बंद पडली.

उकाड्यामुळे डब्यातील प्रवाशांची अक्षरशः घुसमट झाली. अनेक प्रवाशांना, विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. या असुविधेमुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

मांडवी एक्सप्रेसमधील हा बिघाड लक्षात आल्यानंतर, गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकात थांबवून तिचे इंजिन बदलण्यात आले. सुमारे २५ मिनिटांच्या तांत्रिक कामानंतर डब्यातील वातानुकूलन यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, या सर्व प्रक्रियेत आणि तांत्रिक बिघाडामुळे मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस कमालीची उशिराने धावली.

एका गाडीच्या विलंबाचा 'चेन इफेक्ट' कोकण रेल्वेमार्गावरील इतर गाड्यांवरही झाला. परिणामी, आज शनिवारी कोकणकन्या एक्सप्रेससह अनेक प्रमुख गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आणि प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.


 कोकण रेल्वे मार्गावर वारंवार होणारे तांत्रिक बिघाड आणि गाड्यांचा लेटमार्क यामुळे प्रवासी त्रस्त झाले असून, रेल्वे प्रशासनाने गाड्यांच्या देखभालीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.