
रत्नागिरी : कोल्हापूर ते रत्नागिरी हा प्रवास आता अधिक सुखकर आणि जलद होणार आहे.आंबा घाटातील वाहतूक कोंडी आणि घाट रस्त्यातील आव्हाने टाळण्यासाठी या मार्गावर भुयारी मार्ग तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात झालेल्या बैठकीत या प्रकल्पावर शिक्कामोर्तब झाले आहे.हा प्रकल्प एक पथदर्शी (पायलट) प्रकल्प म्हणून विकसित केला जाणार आहे, ज्यामुळे कोल्हापूर आणि रत्नागिरी दरम्यानचे अंतर आणि प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल.मुंबई-गोवा महामार्गावरील टोलच्या दरांबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. टोल कमी करण्याच्या दृष्टीने तांत्रिक आणि प्रशासकीय पावले उचलण्यासाठी लवकरच विशेष अधिकारी गटाची बैठक होणार आहे.
रत्नागिरीतील पायाभूत सुविधा: जिल्ह्यांतर्गत रस्ते जाळे मजबूत करण्यासाठी निवळी-जयगड, जयगड-गुहागर आणि चिपळूण-सातारा या प्रमुख मार्गांच्या अलाईनमेंटचे (रेखांकन) काम प्राधान्याने हाती घेतले जाणार आहे.लांजा, राजापूर, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, खेड, दापोली आणि मंडणगड या मतदारसंघांतील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे निधीची मागणी केली आहे.










