दोडामार्ग : विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान यावे आणि कौशल्य विकास व्हावा या उद्देशाने जि. प. शाळा भेकुर्ली येथील शिक्षकांनी स्तुत्य उपक्रम हाती घेतला. गावाच्या जत्रेत विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने स्टॉल घातला. या स्टॉलला अनेकांनी भेटी देत उपक्रमाचे कौतुक केले शिवाय या स्टॉलवर खरेदीही केली.
भेकुर्ली हा गाव दोडामार्ग तालुका ठिकाणापासून शेवटचे टोक आहे. आजही हा गाव दुर्गम भागात येतो. मर्यादीत वाहतुकीची साधने, रोजगाराचे नसलेले मार्ग यामुळे मोलमजुरी हेच येथील ग्रामस्थांचे रोजगाराचे साधन आहे. मात्र हा गाव तालुक्यात एकसंधतेसाठी प्रसिद्ध आहे. येथील सण, उत्सव विविध उपक्रम ग्रामस्थ एकत्र येऊन मोठया आनंदाने साजरा करून एकीचा आदर्श दाखवत असतात.
भेकुर्ली जि. प. शाळेतील शिक्षक हरिश्चंद्र वळवी आणि आकाश सानप, केंद्रप्रमुख सूर्यकांत नाईक यासह शाळा व्यवस्थापन समितीचे संदीप देसाई, निलेश देसाई, शानू पाटील, भारती झोरे यांनी विद्यार्थ्यांना व्यावहार ज्ञान कृतीयुक्त द्यावे यासाठी गावाच्या जत्रेदिवशी उपक्रम हाती घेतला. सुरुवातीला सकाळच्या सत्रात असणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत लिंबू सरबत विक्री केली. त्यानंतर सायंकाळी ग्रामदेवतेच्या मंदिरालगत भेळ, खाजे, गवती चहा मिळणारा स्टॉल उभारला याला ग्रामस्थांनी प्रतिसाद देत खरेदी केली. याबरोबरच जत्रा उत्सवासाठी आलेले विशेष अतिथी यामध्ये सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, कुंभवडेचे माजी सरपंच विजय गावडे, ग्रुप ग्रामपंचायत केर - भेकुर्लीचे उपसरपंच तेजस देसाई यांनी उपक्रमाचे कौतुक केले. तर सत्यवती देसाई, नम्रता देसाई, सखाराम देसाई, अमृत देसाई, गणेश नवगिरे, निलेश देसाई भेकुर्ली ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.