
कणकवली : नारा हा शब्द समजून घेत घेत कणकवली पर्यंत आलो. हा मेळावा आयोजित करायची वेळ का आली ? ते मला कळलं नाही. कुणामुळे आली, कशासाठी आली ते कळलं नाही. भाजप हा माझ्या आयुष्यातील शेवटचा पक्ष आहे. मात्र, जगेन तर स्वाभिमानानं हा स्वभाव माझा आहे. पदांची अपेक्षा मला नाही. आजवर अनेक पद मला ईश्वरकृपेन मिळाली असं मत माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केले.
आयुष्यात कधी पदाचा गैरवापर केला नाही. धैय्य अन् स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी स्वभावात बदल करत गेलो. मी श्रीमंत घरात जन्मालो नाही. शिवसैनिक झाल्यानंतर शाखाप्रमुख हे माझं पहीलं पद होत. नंतर नगरसेवक, बीएसटी चेअरमन, १९९० ला शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद घेऊन आमदार झालो. कणकवलीत आलो तेव्हा जिल्ह्यातील गरीबी नष्ट करीन अशी शपथ घेतली. लोकांच्या आशीर्वादाने आमदार झालो. त्यानंतर अनेक पद उपभोगली. १० पद राजकारणात पूर्ण केली. जेपीनड्डांमुळे आजही सक्रीय आहे. सिंधुदुर्गच्या जनतेमुळे मी इथवर पोहचू शकलो अस विधान करत ऋण व्यक्त केले.
सिंधुदुर्गचा मला नेता म्हणतात. आज काही येऊ पाहत आहेत, आलेत. मी जिल्ह्यात आलो तेव्हा सोईसुविधा नव्हत्या. घरात बाळंतपण करावं लागतं होत. आज ही परिस्थिती शिल्लक राहीली नाही. धरण बांधली, रस्ते वाड्यावस्त्यांवर पोहचवले. जात, धर्म, पक्ष पाहिला नाही. कोकणान मला सर्वकाही दिलंय. त्यामुळेच शेवटच्या श्वासापर्यंत जिल्हावासियांसाठी काम करण्याची इच्छा आहे. पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून दरडोई उत्पन्न ३ लाखांपर्यंत पोहचवण्याच स्वप्न आहे. राणे पुरून उरतात, राणेंना संपवण सोप्पं नाही. आजवर अनेकांनी प्रयत्न केले पण जमले नाही. मी समर्थ आहे, वय कितीही झालं तरी मागे पाहत नाही. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची काही उपक्रम आम्ही सुरु करत आहोत. आमचं रत्नागिरी, सिंधुदुर्ग समृद्ध करण हे आपलं ध्येय आहे. ३६ जिल्ह्यात आपलं दरडोई उत्पन्न ५ व्या क्रमांकावर आहे. कार्यकर्त्यांच प्रेम बघून भारावतो. आता वाटतात तसं कार्यकर्त्यांना काही दिलं नाही. पहिली निवडणूक दिली तेव्हा पत्नीन ५ लाख दिले. पैसे न घेता निस्वार्थी काम करणारे कार्यकर्ते आमचे आहेत. माझा उद्देश हा जिल्ह्यासाठी काम करणं हा आहे. कोकणात अधिकारी व्हावे म्हणून मेडिकल, इंजिनिअरींग कॉलेज काढल.
राणे विरूद्ध राणे कधी होणार नाही. पक्ष वेगळे आहेत पण ते आम्ही केले नाही. राणे घरात एकत्रच आहे, ते एकत्रच राहणार असं विधान खास. राणेंनी केले. निवडणूकांमुळे जिल्ह्यात कोटी कळू लागलेत. राणेंकडून दूर होण्यासाठी कोटी मिळत आहे. कोटी घ्या माझ्यापासून दूर जा अन तिथल्या बातम्या मला पोहोचवा. दुर गेल्याच काही वाटणार नाही. मात्र, पक्ष सांभाळा, निष्ठा सांभाळा असही आवाहन त्यांनी केले. माणूसकी हे माझ्या आयुष्यातील अंतिम ध्येय आहे. मदत करणं माझं काम आहे. राजकारणात नेहमी कटकारस्थानाला सामोर जावं लागल. आता या शब्दाला मीच पुर्णविराम देण्याच ठरवलं आहे. आता दोन्ही मुलं राजकारणात आहेत. सभागृहातील दोन्ही मुलांचा काम बघून मला अभिमान वाटतो. या दोघांना तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. द्वेषाच्या राजकारणाला मी थारा देणार नाही. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची महायुती आहे. सिंधुदुर्गच्या मातीनं मला घडवलं आहे. इथल्या लोकांच्या प्रेमानं मी घडलो. माझा कार्यकर्ता हा माझा घरचा सहकारी मानतो. पैशांसाठी राजकार करू नका. मेहनतीन पैसा कमवा, असले पैसे पचत नाही, फळत नाही. व्यवसाय करा मेहनतीतून पैसे कमवा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी कुणाला फसवलं नाही, खोटं बोललो नाही. माझ्या जीवनात यशस्वी झालो याच श्रेय जनतेला आहे. माझ्यानंतर निलेश-नितेश तुम्हाला साथ देतील. ते देणारे आहेत, घेणारे नाहीत. मतभेद, फितूरी पक्षात करू नका. मी कुणाला गाडी, पैसे दिले नाही. मात्र, प्रेमानं माणसं जिंकली म्हणून आज असे मेळावे माझ्यासाठी होतात अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी. नड्डा १२ तास काम करतात. त्यांचा आदर्श घेऊन काम करा असं आवाहन केलं.
कुठच्याही प्रकारे कोणतीही अधिकृत माहिती नाही, कोणी प्रसिद्धीपत्रक काढले नाही, कुठच्या पदाधिकाऱ्याने कसलेही जाहीर आवाहन केले नाही. फक्त एकच बॅनर लागला तो म्हणजे एकच नारा...नारायण राणे...या एका बॅनरवर हजारोंच्या संख्येने राणे समर्थक एकवटले होते. बांद्यापासून कणकवली पर्यंत रॅली निघाली. आणि भव्य रॅली नंतर कणकवलीत जाहीर सभा झाली. या सभेत राणे समर्थक आणि राणे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. मात्र, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यासह अन्य कुठच्याच पदाधिकाऱ्यांचे भाषण न होता थेट खासदार नारायण राणे यांच्या भाषणाला सुरुवात झाली. यावेळी व्यासपठीवर सौ. नीलम नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, शिवसेना उपनेते संजय आग्रे, संजू परब, यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.











