
कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या नळपाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचारी गेली अनेक वर्षे अत्यंत तुटपुंज्या वेतनावर अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतन किमान वेतन कायदा १९४८ नुसार निश्चित केलेल्या दरापेक्षा खूपच कमी आहे. सदर कर्मचाऱ्यांना १० ऑगस्टपूर्वी किमान वेतन लागू करावे. त्यांना पावसाळी किट देण्यात यावे व जोखीम विमा उतरविण्यात यावा. अन्यथा, १५ ऑगस्टपासून न. पं. कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा सत्यशोधक कामगार संघटनेचे अध्यक्ष सुदीप कांबळे व सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित जाधव यांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी नगराध्यक्ष व न.पं.च्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. यात म्हटले आहे की, १७जानेवारी, २०२५ रोजी सत्यशोधक कामगार संघटनेच्यावतीने निवेदन देऊन किमान वेतन द्यावे, अशी मागणी करुन आंदोलनाची भूमिका घेण्यात आली होती. परंतु, एक वर्ष लोटूनही अद्याप त्यांच्या वेतनामध्ये फक्त रु. २००० ची वाढ होऊन त्याना रु. ११००० एवढे अदा जात आहेत.
वरील दिलेल्या पत्राची कार्यवाही म्हणून आपण आपल्या कार्यालयामार्फत सहाय्यक आयुक्त, नगरविकास विभाग, सिंधुदुर्ग यांनी कळविलेल्या माहितीनुसार, प्रती कर्मचारी रु. १३००० देत असल्याचा उल्लेख केलेला आहे. ही रक्कमसुद्धा दिशाभूल करणारी असून किमान वेतन कायद्याचे उल्लंघन करणारी आहे. महाराष्ट्र शासन उद्योग-ऊर्जा व कामगार विभाग ९ मार्च, २०२६ च्या अधिसूचनेनुसार नगरपंचायत हद्दीतील कुशल अकुशल कर्मचाऱ्यांचे किमान वेतन निश्चित करण्यात आले आहे. परंतु, सध्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना त्यापेक्षा खूपच कमी वेतन दिले जात आहे. जे कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे. पाणीपुरवठा ही अत्यावश्यक सेवा असून कर्मचारी २४ तास तत्पर सेवा देतात. महागाईच्या काळात कुटुंबांचा उदरनिर्वाह करणे अशक्य झाले आहे. म्हणून, नळपाणी पुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना १० ऑगस्टपूर्वी किमान वेतन कायद्या-नुसार सुधारित वेतन लागू करावे. त्यांना पावसाळी किट व आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य तपासणी करण्यात यावी. त्यांचा जोखीम विमा उतरावा. याबाबत पूर्तता न झाल्यास १५ ऑगस्टपासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असे म्हटले आहे.










