
कणकवली : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून पूर्णानंद महिला मंच, कणकवली यांच्यावतीने कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील शोषित मुक्ती अभियान संस्था संचालित नाग्या महादू आदिवासी निवासी वसतिगृहाला भेट देत आदिवासी विद्यार्थ्यांसोबत हा दिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा करण्यात आला.
यापूर्वी एप्रिल महिन्यात पूर्णानंद महिला मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी वसतिगृहाशी संपर्क साधून तेथे वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती घेतली होती. वसतिगृहात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना कोणत्या प्रकारे सहकार्य करता येईल, याबाबत वसतिगृहाच्या संचालिकांशी चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या आवश्यक गरजांची माहिती घेऊन मंचाच्या सदस्यांनी मदतीचे नियोजन केले.
त्यानुसार जागतिक आदिवासी दिनानिमित्त मंचाच्या १६ सदस्यांनी वसतिगृहाला भेट देत कडधान्ये, साखर, खाद्यतेल, खोबरेल तेल, बिस्किटे, फरसाण, साबण, टूथपेस्ट, टूथब्रश तसेच तयार कपडे अशा विविध वस्तूंची भरगच्च मदत केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नाग्या महादू यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. १९३० साली जुलमी ब्रिटिश राजवटीविरुद्ध चिरनेर जंगलात झालेल्या सत्याग्रहात नाग्या महादू यांनी दिलेल्या प्राणाहुतीचे यावेळी स्मरण करण्यात आले.
यानंतर पूर्णानंद महिला मंचाच्या सदस्यांनी वसतिगृहातील मुलांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्याशी हितगुज केले. तसेच मुलांना काही समूहगीते शिकवून त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालविले. वस्तुरूप मदतीसोबतच विद्यार्थ्यांशी साधलेला हा संवाद त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा ठरला. यावेळी वसतिगृहाच्या संचालिका श्रीमती आईर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्णानंद महिला मंचाच्या सदस्यांचे आभार मानले. जगभरात जागतिक आदिवासी दिन साजरा होत असताना वेताळ बांबर्डे येथील आदिवासी विद्यार्थ्यांसोबतही हा दिवस उत्साहात साजरा करण्याची संधी पूर्णानंद महिला मंचामुळे मिळाली, याबद्दल त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. पूर्णानंद महिला मंचाने सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.











