LIVE UPDATES

महावितरणच्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त

रस्ता तातडीने पूर्ववत करण्याचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे आदेश | महावितरणकडून दोन दिवसात काम पूर्ण करण्याचं आश्वासन
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: May 25, 2026 19:20 PM
views 26  views

कणकवली : कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौक ते लक्ष्मी चित्रमंदिरपर्यंत महावितरणकडून भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम झाले असून , या कामासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने खोदकाम केलेला रस्ता तातडीने दुरुस्त करून वाहतुकीस सुरळीत करावा, अशा स्पष्ट सूचना नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

पटवर्धन चौक ते लक्ष्मी चित्रमंदिर या मार्गावरील रस्त्याच्या डाव्या बाजूस भूमिगत विजवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, खोदकामानंतर रस्त्याचे तातडीने काँक्रीटीकरण करण्याऐवजी संबंधित ठेकेदाराने केवळ माती टाकून काम उरकले. परिणामी पादचारी व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच मान्सूनपूर्व पावसामुळे या परिसरात चिखलमय परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर सोमवारी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी नगरसेवक लुकेश कांबळे, सत्यजित पारकर, कन्हैया पारकर, सुजीत जाधव, तेजस राणे, हरी निखार्गे, रामदास मांजरेकर, अमित मयेकर, तेजस नार्वेकर,आदी उपस्थित होते. खोदकाम केल्यानंतर रस्ता तातडीने पूर्ववत न केल्याबद्दल नगराध्यक्ष पारकर यांनी ठेकेदाराच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना खडसावत ठेकेदाराला तातडीने डागडुजी व काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले. शहरातील विविध रस्त्यांवर पडलेले खड्डेही लवकरच बुजविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असल्याने रात्री १० नंतर खोदकाम झालेल्या भागाचे रोलरद्वारे सपाटीकरण करण्यात येणार असून, त्यानंतर काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी किमान दोन दिवस लागतील, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.