LIVE UPDATES

मालवणातील नामांकित शैक्षणिक संस्थेचा महापराक्रम

संमतीशिवाय 'युजर आयडी' - 'पासवर्ड'चा वापर करून बदलला कॉलेजचा पसंतीक्रम
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 25, 2026 19:46 PM
views 35  views

मालवण : शहरातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या संमतीशिवाय थेट 'युजर आयडी' आणि 'पासवर्ड'चा अनधिकृत वापर करून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील कॉलेजच्या पसंतीक्रमात परस्पर बदल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या फसवणुकीमुळे संतप्त झालेल्या पालकांनी संबंधित संस्थेच्या मुख्याध्यापकांना जाब विचारला असता, मुख्याध्यापकांनी 'त्या' पालकांनाच उद्धट उत्तरे दिली. या संपूर्ण प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून, या फसवणुकीविरोधात शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.

शहरातील एका शैक्षणिक संस्थेमध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थिनीने अकरावी प्रवेशासाठी नावनोंदणी केली होती. तिला पुढील शिक्षणासाठी शहरातील दुसऱ्या एका महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. त्यानुसार तिने ऑनलाइन प्रवेश अर्जात त्या दुसऱ्या कॉलेजचे नाव टाकून आपला अर्ज 'लॉक' केला होता. मात्र, ती आधी ज्या संस्थेत शिकत होती, त्या संस्थेने नियमांची पायमल्ली करत, विद्यार्थिनी किंवा तिच्या पालकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता तिच्या युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉगिन केले. त्यानंतर त्या अर्जात बदल करून स्वतःच्याच कॉलेजचे नाव प्रथम क्रमांकावर टाकले. केवळ याच विद्यार्थिनीच्या बाबतीत नव्हे, तर इतरही काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांच्या इच्छेविरुद्ध इतर कॉलेजांची नावे परस्पर नोंदवण्यात आल्याचे समोर आले आहे.

आज संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपली खात्री करण्यासाठी अकरावी प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज पुन्हा तपासून पाहिले. त्यावेळी अर्जातील कॉलेजचे नाव बदलल्याचे पाहून विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा धक्का बसला. पालकांनी तत्काळ संबंधित संस्थेत धाव घेऊन मुख्याध्यापकांना याबाबत जाब विचारला. मात्र, झालेल्या चुकीची जबाबदारी घेण्याऐवजी मुख्याध्यापकांनी पालकांना उद्धटपणे उत्तरे दिल्याने पालकांच्या संतापात आणखी भर पडली.

एकीकडे ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना पालकांना सर्व्हर डाऊन आणि इतर अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच शैक्षणिक संस्थेनेच विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा देत परस्पर कॉलेजचे नाव बदलणे, हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि शिक्षणाशी खेळण्याचाच प्रकार आहे. अशी प्रतिक्रिया संतप्त पालकांनी दिली.  

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत गोपनीय मानले जाणारे युजर आयडी आणि पासवर्ड संस्थेकडे सुरक्षित राहणे अपेक्षित असताना, त्याचा गैरवापर करून विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. स्वतःच्या कॉलेजची पटसंख्या वाढवण्यासाठीच संस्थेने हे बेकायदेशीर कृत्य केल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी पालक आता एकवटले असून, याप्रकरणी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करणार असल्याचे पालकांनी स्पष्ट केले आहे.