कै. जयानंद मठकर व्याख्यानमालेस प्रारंभ

स्मृती पुरस्कार मान्यवरांना प्रदान
Edited by:
Published on: April 07, 2026 21:17 PM
views 33  views

सावंतवाडी : श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडी आणि सावंतवाडी सहकारी पतपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य सैनिक जयानंद मठकर व्याख्यानमाला ७ एप्रिल ते शनिवार ११ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आली असून याला आज प्रारंभ करण्यात आला. व्याख्यानमालेचे यंदाचे २२ वे वर्ष असून या व्याख्यानमालेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परूळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जाहीर करण्यात आलेल्या विविध पुरस्कारांचे वितरण या निमित्ताने करण्यात आले. पुढील चार दिवस विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने इथे संपन्न होणार आहेत.

जयानंद मठकर व्याख्यानमालेचे औचित्य साधून दरवर्षी काही पुरस्कार जाहीर केले जातात. यंदाचा मठकर स्मृती पुरस्कार ओणी राजापूर येथील वात्सल्य मंदिरचे संस्थापक डॉ. महेंद्र मोहन यांना प्रदान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परूळेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरीत करण्यात आला. यावेळी बांदा येथील मानसोपचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांची प्रमुख प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्राचार्य अल्ताफ खान उत्कृष्ट वाचक पुरस्कार कवी मधुकर मातोंडकर, प्रा. पांडुरंग येजरे कार्यकर्ता पुरस्कार सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार तर प्रा. मिलिंद भोसले स्मृती ग्रंथालय वाचक पुरस्कार सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका राजश्री टिपणीस यांना प्रदान करण्यात आला. तसेच बॅ. नाथ पै सेवांगण मालवणचा जीवन गौरव पुरस्कार डॉ. महेंद्र मोहन यांना यावेळी प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष पद्मनाभ शिरोडकर, डॉ. रूपेश पाटकर, श्रीराम वाचन मंदिराचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्यवाह रमेश बोंद्रे, कार्याध्यक्ष ॲड. संदिप निंबाळकर आदी उपस्थित होते. 

यावेळी पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. पुरस्काराला उत्तर देताना डॉ. मोहन म्हणाले, पुस्तक वाचता वाचता मी माणसं वाचायला शिकलो. लाखामागे एक डॉक्टर बनत असल्याने व लोकांना आरोग्य सेवा मिळत नसल्याने खेड्यात जाऊन लोकसेवा करण्याचा वडीलांनी दिलेला संदेश घेऊन मी कार्य केल. यातच समाजातील लोकांशी संपर्क येत गेला अन् त्यातून मी घडत गेलो. माणुसकीचा धर्म जपत मी कार्यरत राहिलो असे प्रतिपादन केले. तर डॉ. रूपेश पाटकर म्हणाले, आज समाजात पुरस्कार द्यावेत अशी मंडळी फार कमी आहेत. मात्र, आजचे पुरस्कार प्राप्त मान्यवर बघता योग्य व्यक्तींचा सन्मान करण्यात आल्याचे उद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा. प्रवीण बांदेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुमेधा नाईक-धुरी तर आभार रमेश बोंद्रे यांनी मानले. याप्रसंगी डॉ. जी.ए. बुवा, अजय कांडर, डॉ. जयेंद्र परुळेकर, विजय ठाकर, विजय फातर्पेकर, ॲड. अरूण पणदुरकर, गणेश बोर्डेकर, डॉ. ज्योती तोरसकर, नंदू पाटील, विजयालक्ष्मी पाटील, लक्ष्मीकांत खोबरेकर, भाई देऊलकर, वंदना करंबेळकर, सीमा मठकर, कल्पना बांदेकर, सरिता पवार, मानसी भोसले, विठ्ठल कदम, भरत गावडे, डॉ. दीपक तुपकर, लक्ष्मण पावसकर, दत्तप्रसाद गोठसकर, मुकुंद वझे, गोविंद वाडकर, राजेश मोंडकर, चंद्रकांत शिरोडकर, सखी पवार, नम्रता नेवगी,  साक्षी पवार आदी उपस्थित होते.