दहीबावमध्ये 'गंगामाई' अवतरली!

श्रद्धेचा पूर आणि भाविकांची दर्शनासाठी मांदियाळी
Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 07, 2026 21:22 PM
views 42  views

देवगड: कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या राजापूरच्या गंगेपाठोपाठ, आता देवगड तालुक्यातील दहीबाव येथेही गंगामाईचे मंगलमय आगमन झाले आहे. कुंडातील पाणी दुधाळ होऊ लागल्याने गंगा प्रगटल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि भाविकांनी गंगाक्षेत्राकडे धाव घेतली.

पाणी झाले 'दुधाळ'; निसर्गाचा अद्भुत चमत्कार!- दहीबाव येथील मुख्य कुंड सध्या तुडुंब भरून वाहत असून, गोमुखातून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, गंगा प्रगटण्यापूर्वी कुंडातील पाणी दुधाळ रंगाचे झाले होते. याच वेळी परिसरात वेगाने वारे वाहू लागल्याने निसर्गातही चैतन्य निर्माण झाले. संतोष शेट्ये व ग्रामस्थांनी हा बदल प्रथम अनुभवला आणि गंगा अवतरल्याची खूण पटताच सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. संतोष शेट्ये व काही ग्रामस्थ आल्यावर त्यांना कुंडातील पानी दुधाळ झाल्यासारखे दिसले त्यामुळे त्यांनी त्याच प्रमाणे वातावरणातील बदल मोठमोठ्याने वारे वाहू लागल्याचा अंदाज आल्यामुळे त्यांना गंगा प्रगट झाल्याचे यावेळी निदर्शनास आले.

भालचंद्र महाराजांच्या वास्तव्याने पावन भूमी दहीबावच्या या गंगाक्षेत्राला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा लाभला आहे. थोर संत भालचंद्र महाराज या ठिकाणी तपश्चर्या करत असत, असे जाणकार सांगतात. महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीवर गंगेचे दर्शन घेण्यासाठी देवगडसह संपूर्ण जिल्ह्यातून भाविक येत असून अनेकांनी पवित्र स्नानाची पर्वणी साधली. पूर्वी दर तीन वर्षांनी नियमित येणारी गंगा आता काहीशा बदललेल्या कालचक्रानुसार प्रगटत आहे. गेल्या काही वर्षांत तिच्या वास्तव्याचा कालावधीही वाढला आहे. राजापूरच्या गंगेनंतर साधारण आठ दिवसांच्या अंतराने दहीबावची गंगा प्रगटते, हा अनुभव यंदाही कायम राहिला.