
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मा. प्रमोद कामत यांचे कुडाळ एम.आय.डी.सी. इंडस्ट्रिज असोसिएशनच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रमोद कामत यांची निवड ही एका निष्ठावान आणि अनुभवी कार्यकर्त्याचा सन्मान असल्याचे भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामविकासाचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या एका स्वच्छ चारित्र्याच्या कार्यकर्त्याला पक्षनेतृत्वाने ही मोठी संधी दिली आहे. कामत हे आपल्या अनुभवाच्या जोरावर या संधीचे निश्चितच सोने करतील आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, विशेषतः औद्योगिक आणि ग्रामीण क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहतील, असा विश्वास असोसिएशनने व्यक्त केला.
यावेळी कुडाळ एम.आय.डी.सी. इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर आणि कार्यवाह ॲड. नकुल पार्सेकर यांनी कामत यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. या प्रसंगी असोसिएशनचे सहकार्यवाह कुणाल ओरसकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न मार्गी लावतानाच उद्योगांनाही प्रशासकीय स्तरावर सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.











