
सावंतवाडी : तालुक्यातील सरमळे येथील एका रबर प्लांटेशनमध्ये मंगळवारी अत्यंत दुर्मिळ अशा 'किंग कोब्रा' प्रजातीचा साप आढळला. या सापाला वनविभागाने नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या मुक्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरमळे येथील मॅथ्यु शॉबिन यांच्या रबर प्लांटेशनमध्ये मंगळवारी एक मोठा साप दिसून आला. त्यांनी तात्काळ स्थानिक सर्पमित्र योगेश वेंगुर्लेकर यांच्याशी संपर्क साधला. वेंगुर्लेकर यांनी घटनास्थळी जाऊन सापाचे रेस्क्यू केले असता तो किंग कोब्रा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या घटनेची माहिती तातडीने सावंतवाडी वनविभागाला देण्यात आली.
वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून सापाची प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर वनकर्मचारी व जलद बचाव पथकाच्या निरीक्षणाखाली या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ही कार्यवाही उप वनसंरक्षक मिलीश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सुहास पाटील, वनरक्षक पवन टारपे तसेच जलद कृती दलाचे सदस्य रामचंद्र रेडकर, शुभम पाठक आणि शुभम कळसुलकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली.











