
सावंतवाडी : करिअर कट्टा उपक्रमांतर्गत द्वितीय वर्ष बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘इंडक्शन अवेअरनेस' कार्यक्रमाचे आयोजन ७ ऑगस्ट रोजी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाला गोगटे-वाळके कॉलेज, बांदा येथील डॉ. रमाकांत गावडे, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुका करिअर कट्टा समन्वयक, तसेच पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथील डॉ. नीलम धुरी, सावंतवाडी करिअर कट्टा समन्वयक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ए. जगताप, महाविद्यालयीन करिअर कट्टा समन्वयक तसेच प्रशिक्षण व नेमणूक विभाग प्रमुख प्रा. नमिता भोसले व प्रा. प्रिया यादव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रमाकांत गावडे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर कट्ट्याची संकल्पना, त्याची उद्दिष्टे तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधींची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन स्वतःच्या करिअरविषयी योग्य नियोजन करावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी करिअर संसद अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थी पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री, विविध खात्यांचे मंत्री तसेच संसद सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या मुख्य सत्रात डॉ. नीलम धुरी यांनी विद्यार्थ्यांना करिअर कट्ट्याची संकल्पना, विविध उपक्रम, कौशल्य विकास, व्यक्तिमत्त्व विकास, स्पर्धा परीक्षा, रोजगाराच्या संधी तसेच उद्योजकता याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञानापुरते मर्यादित न राहता विविध कौशल्ये विकसित करून भविष्यातील करिअरसाठी स्वतःला सक्षम बनवावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना करिअर कट्ट्याच्या विविध उपक्रमांची माहिती मिळाली तसेच भविष्यातील करिअर नियोजनासाठी उपयुक्त मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नमिता भोसले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. नमिता भोसले व प्रा. प्रिया यादव यांनी विशेष परिश्रम घेतले.










