LIVE UPDATES

तळेबाजार व बागतळवडे अंगणवाडीत जागतिक स्तनपान सप्ताह

माता व बालकांच्या आरोग्याबाबत जनजागृती : स्तनपानाचे महत्त्व दिले पटवून
Edited by:
Published on: August 08, 2026 18:20 PM
views 33  views

देवगड : तालुक्यातील तळेबाजार व बागतळवडे अंगणवाडी केंद्रात जागतिक स्तनपान सप्ताह विविध जनजागृतीपर उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माता, गर्भवती महिला तसेच उपस्थित महिलांना स्तनपानाचे महत्त्व आणि त्याचे माता व बालकांच्या आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याबाबत डॉ .पल्लवी मुंडे यांनी मार्गदर्शन केले .

कार्यक्रमात नवजात बालकासाठी आईचे दूध हे सर्वोत्तम व नैसर्गिक पोषण असल्याचे सांगण्यात आले. बाळाच्या सर्वांगीण वाढीसाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी स्तनपान महत्त्वाचे असल्याचे उपस्थितांना समजावून सांगण्यात आले. तसेच बाळाला योग्य पद्धतीने स्तनपान कसे करावे, स्तनपान करताना घ्यावयाची काळजी आणि मातांनी सकस आहार घेण्याचे महत्त्व याबाबतही पर्यवेक्षिका पुजा सावंत यांनी माहिती दिली. यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी उपस्थित महिलांमध्ये स्तनपानाबाबत जनजागृती केली. ‘आईचे दूध—बाळासाठी अमृत’ हा संदेश देत प्रत्येक मातेला स्तनपानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून माता व बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी स्तनपानाबाबत योग्य माहिती आणि जनजागृती घराघरात पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला तळेबाजार अंगणवाडी सेविका शोभा कुबडे, मदतनिस मंदा साटम , बागतळवडे अंगणवाडी सेविका समीक्षा साटम, मदतनीस तन्वी साटम, आशा सेविका ज्योती मोरे आदी उपस्थित होते .