कळसुलकर शाळेच्या ‘डिजिटल वर्ग खोली’चे उद्घाटन

कै. प्रा.अल्ताफ खान यांच्या स्मृती प्रित्यर्थ कुटुंबियांचा पुढाकार
Edited by: विनायक गांवस
Published on: April 14, 2026 19:01 PM
views 18  views

सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक कै. प्रा. अल्ताफ खान यांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या ‘डिजिटल वर्ग खोली’चे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. हा सोहळा खान परिवाराच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या डिजिटल कक्षाचे उद्घाटन प्रा. खान यांच्या भगिनी सौ. अमीना नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. 


यावेळी त्यांचे बंधू अबिद खान, बहीण खैरू खान, भाची नूरजहा नाईक तसेच खान कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई, सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, खजिनदार मुकुंद वझे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोस्कर, संचालिका राजश्री टिपणीस, ॲड. नम्रता नेवगी, संचालक नीरज देसाई, राजू मसुरकर, तसेच आरपीडी हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक जगदीश धोंड व माडखोल हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक भरत गावडे यांची उपस्थिती लाभली. यावेळी कळसुलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.व्ही.भुरे यांनी प्रस्ताविकातून कै. प्रा. अल्ताफ खान यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. तसेच मान्यवरांनी आपल्या भाषणातून प्रा. खान यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व कार्याचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

खान कुटुंबाच्या वतीने सौ.नूरजहा नाईक यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. कै.अल्ताफ खान यांनी आपल्या अध्यापन काळात हजारो विद्यार्थ्यांना घडवले. त्यांच्या शिस्तबद्ध आणि प्रेमळ स्वभावामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. हिंदी विषयातील प्रभुत्व आणि वाचनाची आवड यामुळे त्यांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. नव्या पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण मिळावे, या उद्देशाने खान परिवाराने हा डिजिटल कक्ष शाळेला भेट दिला आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक दिगंबर सारंग यांनी केले. तर आभार प्रदर्शन उत्तम पाटील यांनी मानले.