सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे महत्त्वाची 'प्रि-मान्सून' आढावा बैठक

Edited by: विनायक गांवस
Published on: April 27, 2026 16:34 PM
views 54  views

सावंतवाडी : पावसाळा तोंडावर असल्याने सावंतवाडी शहरात उद्भवू शकणाऱ्या समस्यांचा विचार करून आज सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे महत्त्वाची 'प्रि-मान्सून' आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा आणि सत्ताधारी नगरसेवकांनी शहरातील कामांचा सविस्तर आढावा घेत विविध विभागांना कडक सूचना दिल्यात

बैठकीत सर्व नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील गटर आणि नाले सफाई तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.  शहरातील आरोग्य व्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी नगरपालिका दवाखाना सज्ज, पावसाळी आजारांचा सामना करण्यासाठी पालिका दवाखाना पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आला आहे. नगराध्यक्षांनी दवाखान्यासाठी आवश्यक औषधांची आगाऊ मागणी नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. पावसाळ्यात शॉर्ट सर्किट किंवा वीज जाण्याचे प्रकार टाळण्यासाठी शहरातील विद्युत पोलची तपासणी करून ते सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना विद्युत विभागाला देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या घरावर झुकलेल्या आणि जीर्ण झालेल्या झाडांच्या फांद्या तातडीने तोडण्याचे आदेश दिलेत. यासाठी अनुभवी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असून झाडांबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने निकाली काढल्या जातील.

रस्ते आणि पाईपलाईन कामाचा अल्टिमेटम शहरात सुरू असलेल्या MNGL आणि वॉटर पाईपलाईनच्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्ते आणि गटारे मातीने भरली आहेत. यावर नगराध्यक्षांनी कडक पावले उचलली आहेत. संबंधित कंत्राटदारांना गटारे सुस्थितीत करण्यासाठी केवळ ८ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विस्कळीत झालेले सर्व रस्ते १५ मे पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. जेणेकरून पावसाळ्यात चिखलाचा त्रास होणार नाही. आपत्ती व्यवस्थापन आणि नियंत्रण कक्ष अतिवृष्टी आणि वादळाचा धोका लक्षात घेऊन नगरपरिषदेने 'आपत्ती व्यवस्थापन कक्ष' स्थापन केला आहे.

सक्षम नियंत्रण केंद्र- हवामान खात्याच्या सूचनेनुसार तात्काळ हालचाली करण्यासाठी सक्षम दळणवळण व्यवस्था आणि कृती आराखडा तयार आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन दलाची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले दैनंदिन कामकाज सांभाळून आपत्कालीन परिस्थितीत आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, जेणेकरून शहरवासीयांना कोणताही त्रास होणार नाही. सावंतवाडी शहर पावसाळ्यासाठी सज्ज झाले असून, प्रशासनाने आता कामाचा धडाका लावण्याचे निश्चित केले आहे.