
मुरबाड : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल मा. श्री. निलेश सांबरे यांचा मुरबाड येथील नागरिकांच्या वतीने कुणबी समाज हॉल, म्हसा रोड येथे भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, व्यापारी, युवक तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना मा. श्री. निलेश सांबरे यांनी उपस्थितांचे आभार मानत आपल्या विजयाचे श्रेय जनतेला दिले. ते म्हणाले, “या निवडणुकीत मी एकट्याने अनेक प्रस्थापितांच्या विरोधात लढलो. कोणत्याही मोठ्या पॅनेलची साथ नसतानाही ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सभासद, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेची ताकद माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळेच हा विजय शक्य झाला. हा केवळ माझा विजय नसून परिवर्तनावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक सभासदाचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा विजय आहे. या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सर्वसामान्य सभासद, शेतकरी आणि कष्टकरी जनतेची बँक आहे. त्यामुळे बँकेच्या कामकाजात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ देणार नाही. प्रत्येक निर्णय पारदर्शक, नियमबद्ध आणि सभासदांच्या हिताचा असेल. बँकेतील भरती प्रक्रिया पूर्णपणे IBPS पद्धतीने, गुणवत्ता आणि पारदर्शकतेच्या आधारे व्हावी यासाठी मी संचालक म्हणून ठाम भूमिका घेणार आहे. तसेच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पात्र स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे.”यावेळी त्यांनी बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी सभासदांचा विश्वास जपणे, पारदर्शक प्रशासन, स्थानिकांना न्याय, शेतकरी व सहकार क्षेत्राला बळकटी देणे आणि बँकेला राज्यातील आदर्श सहकारी बँक बनविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांनी मा. श्री. निलेश सांबरे यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.











