
राजापूर : तालुक्यातील सोलगाव येथील अनेक ग्रामस्थांनी राजापूर पंचायत समितीचे उपसभापती व भाजप जिल्हा सरचिटणीस अभिजीत गुरव यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे सोलगाव परिसरातील भाजप संघटनेला मोठे बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
यावेळी भाजप तालुका सरचिटणीस संदेश विचारे, कोदवली ग्रुप ग्रामपंचायत सदस्य अशोक गुरव, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते विनायक दीक्षित, प्रदीप म्हादळकर, शशी गुरव आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत पक्षाची ध्येयधोरणे गावागावात पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये रोहिदास गुरव, प्रकाश गुरव, अनिल गुरव, विकास गुरव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता. पक्षप्रवेशानंतर उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.












