पोलीस वसाहतीजवळच अवैध गोवा दारू विक्रीचा अड्डा

उपसभापती अभिजीत गुरव यांची धाड; राजापूरात खळबळ
Edited by: राजू जोगळे
Published on: May 13, 2026 17:28 PM
views 33  views

राजापूर : शहरात अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्रीचा सुळसुळाट सुरू असतानाच, पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत या काळ्या धंद्यावर धाड टाकली आहे. राजापूर पंचायत समितीचे उपसभापती अभिजीत गुरव यांनी शहराच्या मध्यवस्तीत सुरू असलेल्या एका अवैध दारू अड्ड्यावर अचानक छापा टाकत बेकायदेशीर विक्री उघडकीस आणली. विशेष म्हणजे हा अड्डा पोलीस वसाहतीच्या हाकेच्या अंतरावर सुरू असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि रहदारीच्या ठिकाणी गोवा बनावटीच्या दारूचा बेकायदेशीर व्यापार सुरू होता. रहिवासी वस्ती तसेच शेजारीच पोलीस वसाहत असतानाही हा व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असल्याचे पाहून नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. उपसभापती अभिजीत गुरव यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत या प्रकाराची पाहणी केली आणि संबंधित प्रकार उघडकीस आणला.

राजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये तसेच वाड्या-वस्त्यांवर गोवा बनावटीच्या दारूची खुलेआम विक्री सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात आहेत. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने आता लोकप्रतिनिधींनाच रस्त्यावर उतरून कारवाई करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे राजापूर पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

यापूर्वीही अनेकदा लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत अशाच प्रकारच्या धाडी टाकल्या होत्या. मात्र काही दिवस परिस्थिती शांत राहिल्यानंतर पुन्हा हे अवैध धंदे सुरू होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे “राजापूर पोलिसांचे या अवैध दारू विक्रेत्यांना अभय आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, अवैध दारू विक्रीमुळे तालुक्यातील सामाजिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, या प्रकरणातील दोषींवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.