सिंधुदुर्ग रेल्वे परिषद २०२६ चे १७ मे रोजी कसाल येथे आयोजन

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: May 13, 2026 18:40 PM
views 65  views

सिंधुदुर्गनगरी :  कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने “सिंधुदुर्ग रेल्वे परिषद २०२६” चे आयोजन रविवारी १७ मे रोजी करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत कुडाळ तालुक्यातील कसाल येथील साई माऊली बँक्वेट हॉल, बालमवाडी येथे ही परिषद होणार आहे. या परिषदेला खासदार आमदार यांच्यासह भारतीय रेल्वे, कोकण रेल्वेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत कसाल रेल्वे स्टेशन व्हावे ही प्रमुख मागणी लावून धरली जाणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रकाश पावसकर व जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

      सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश पावसकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी तसेच रेल्वे प्रवाशांना भारतीय रेल्वेच्या सिटिझन चार्टरमध्ये नमूद असलेल्या हक्कांच्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी या परिषदेत चर्चा होणार असल्याची माहिती दिली.

     पिडीत, वंचित आणि त्रस्त रेल्वे प्रवाशांनी एकजूट दाखवून शासनाला जागे करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. परिषदेसाठी सहकुटुंब व मित्रमंडळींसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कसाल रेल्वे स्टेशन व्हावे ही प्रमुख मागणी -  १७ मे रोजी कसाल येथे होणाऱ्या सिंधुदुर्ग रेल्वे परिषदेत कसाल रेल्वे स्थानकावर जास्त भर दिला जाणार असून हे स्थानक पुढील ६ महिन्यात मंजूर व्हावे ही प्रामुख्याने मागणी लावून धरली जाणार असल्याचे ॲड नंदन वेंगुर्लेकर यांनी यावेळी सांगितले 

गोव्याच्या धर्तीवर जिल्ह्यातील स्थानकांचा विकास व्हावा- रेल्वे प्रशासनाने ज्या प्रकारे गोवा राज्यातील रेल्वे स्थानकावर सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तशाच सोयीसुविधा जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून द्यावेत याकडेही यावेळी लक्ष वेधले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नवीन रेल्वे ट्रॅक सुरू करावा- जिल्ह्यातील सागरी भागाचा विकास होण्यासाठी जिल्ह्यात नव्याने कणकवली ते जामसंडे, सिंधुदुर्ग ते तारकर्ली आणि सावंतवाडी ते वेगुर्ला असा नवीन रेल्वे ट्रॅक तयार करून तेथून रेल्वे सुरू करण्यात याव्यात यासाठी आपले प्रयत्न असल्याचे यावेळी वेंगुर्लेकर यांनी सांगितले.