
वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील निमअरूळे ग्रामपंचायतीने शासनाच्या स्वगणना मोहिमेत १०० टक्के यश मिळवत तालुक्यातील पहिली स्वगणना पूर्ण करणारी ग्रामपंचायत म्हणून मान मिळवला आहे. तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात ही मोहीम सुरू असून निमअरूळे ग्रामपंचायतीने अल्पावधीत हे उद्दिष्ट पूर्ण केले.
वैभववाडी तालुक्यातील सर्व गावात जनगणनेची मोहीम सुरू करण्यात आली आहे तालुक्यातील निमअरुळे गावाने सर्वप्रथम स्वगणना पुर्ण केली. ८ आणि ९ मे या दोन दिवसांत निमअरूळे ग्रामपंचायत क्षेत्रात विशेष स्वगणना मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेची जबाबदारी शिक्षक विवेकानंद कडू यांच्यासह तलाठी गणेश गोडे, तलाठी अक्षय लोणकर आणि अन्य कर्मचाऱ्यांवर होती. सरपंच सज्जन माईणकर तसेच ग्रामसेवकांनीही या मोहिमेस पूर्ण सहकार्य केले.मोहिमेदरम्यान माईणकरवाडी, कुंभारवाडी आणि बौद्धवाडी येथे कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना स्वगणना करण्यासाठी प्रोत्साहित केले. गावात नेटवर्कची समस्या असूनही तसेच लग्नसराई व धार्मिक कार्यक्रम सुरू असतानाही पथकाने विविध पद्धतींचा वापर करून नागरिकांकडून माहिती भरून घेतली. निमअरूळे गावातील एकूण ६१ कुटुंबांची स्वगणना पूर्ण करण्यात आली असून या यशामुळे ग्रामपंचायतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.











