
कुडाळ : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या जिल्हा शाखा सिंधुदुर्ग, महिला जिल्हा शाखा व मुंबई जिल्हा शाखा, समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ९ वी बौद्ध धम्म परिषद रविवार दि. १७ मे रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत कुडाळ उद्यमनगर येथील वासुदेवानंद हाॅल (आर.एस.एन.हाॅटेलच्या मागे) येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला उदघाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ.भीमराव यशवंत आंबेडकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहीती भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. ते कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या परिषदेला प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातसून दर्शनाताई आंबेडकर, रेडिओलाॅजिस्ट डाॅ.सतीश पवार, मार्गदर्शक म्हणून राज्य अध्यक्ष यु.जी.बोराडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड.एस.के भंडारे, राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी भिकाजी कांबळे उपस्थित राहणार आहेत. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे माजी राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव, मुंबई विभागाचे माजी अध्यक्ष भिकाजी वर्देकर, माजी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम व पं.ध.माणगांवकर, पूर्व मुंबई झोन क्र.५ चे अध्यक्ष अनंत जाधव, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे, समता सैनिक दलाचे मेजर अरूण जाधव, सिनियर डिव्हिजन ऑफीसर संजय जाधव, मुंबई प्रदेश झोन क्र.२ चे प्रभारी संघटक तथा कोषाध्यक्ष अशोक जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनंत सावंत, दि.बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष शाम जाधव, मुंबई विभागाचे माजी संघटक बी.बी. जानवलकर व गोवा राज्य अध्यक्ष एस.के.जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, असे श्री.कासार्डेकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना श्री.कासार्डेकर म्हणाले की,, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ही संस्था स्थापन केली असून, बौद्ध बांधवांची मातृसंस्था मानली जाते. जिल्ह्यातील सर्व बौद्ध समाज संघटनांना एकत्र घेऊन ही संस्था काम करते. दरवर्षी संस्थेच्या वतीने धम्म परिषद आयोजित करण्यात येते. जिल्ह्यात आतापर्यंत आठ परिषदा झाल्या असून, कुडाळ येथे रविवारी होणारी ही नववी धम्म परिषद आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची ध्येय धोरणे व उद्दीष्टे सर्वांपर्यंत पोहोचावीत, समाज बांधवांमध्ये एकसुत्रीपणा असावा, समाजात समता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने हि परिषद होत आहे. समाजातील अनेक ज्वलंत प्रश्नांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भिमराव आंबेडकर यांचे २८ राज्यात बी.एस.आय मिशन २०२५ सुरू असून त्यांच्या संकल्पनेतील ८ गोल्डन पॉईट व बी. एस. आय. मिशन २०२५ या विशेष कार्यक्रम सर्वत्र राबवला जात आहे. रविवार १७ मे रोजी सकाळी ११ वा. आदर्शांच्या प्रतिमांचे पूजन, पूज्य भदंत धम्मानंद महाथेरो, (पुणे) यांच्याकडून त्रिसरण पंचशील ग्रहण/धम्मदिक्षा कार्यक्रम व मान्यवरांचे स्वागत - सत्कार, स्वागत गीत - महिला जिल्हा शाखा. दुपारी १२ वाजता चर्चासत्र व मार्गदर्शन, विषय - उपवर्गीकरण व बौद्ध जनगणना. मार्गदर्शक - राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. एस.के.भंडारे, २ वाजता बी.एस.आय. मिशन २०२५, भारतीय संविधान व आव्हान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती गतिमान कशी करावी या विषयांवर मार्गदर्शक राज्य शाखा अध्यक्ष यु.जी.बोराडे, राष्ट्रीय सचिव भिकाजी कांबळे व लेखक मंजुल भारद्वाज यांचे मार्गदर्शन होणार आहे, सायं. ४ वा. पूज्य भदंत धम्मानंद महाथेरो, (पुणे) यांचे मार्गदर्शन व नंतर समारोप होणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जी चळवळ सुरू आहे ती म्हणजे बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती. या धम्म परिषदेच्या माध्यमातून महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा अधिक तीव्र केला जाणार आहे. या परीषदेमध्ये काही महत्वाचे ठराव आपल्याला मांडण्यात येणार आहेत. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम बौध्द बांधवांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन, श्री.कासार्डेकर यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेला जिल्हा सचिव संजय पेंडूरकर, मोहन जाधव, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष चंद्रकांत म्हापणकर, कुडाळ तालुकाध्यक्ष निलेश वर्देकर, सचिव रामचंद्र वालावलकर, मालवण तालुकाध्यक्ष रविकांत कदम, समता सैनिक दलाचे जिल्हा प्रमुख गुणाजी जाधव, रमेश कदम आदी उपस्थित होते.











