कुडाळमध्ये नवनिर्वाचित सदस्यांचा गौरव

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 12, 2026 22:47 PM
views 42  views

कुडाळ: "जोपर्यंत लोकप्रतिनिधी सोबत नसतात, तोपर्यंत विकासकामे मार्गी लागत नाहीत. लोकप्रतिनिधी हे थेट जनतेशी जोडलेले असतात. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी ही विकासाच्या रथाची दोन चाके असून, ही दोन्ही चाके ताळमेळाने चालली तर तालुक्याचा विकास झपाट्याने होईल," असे प्रतिपादन कुडाळचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी केले.

कुडाळ पंचायत समिती, कुडाळ तालुका सरपंच संघटना आणि ग्रामसेवक संघटनेच्या वतीने तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा पंचायत समितीच्या सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

लोकप्रतिनिधींचा सन्मान राखा- यावेळी श्री. वालावलकर यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, लोकप्रतिनिधींचा सन्मान राखणे हे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. पालकमंत्री, आमदार आणि सर्व सदस्यांच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाचे स्वप्न आपल्याला एकत्रितपणे साकार करायचे आहे.

या कार्यक्रमाला सहाय्यक गटविकास अधिकारी, सरपंच संघटना अध्यक्ष राजन परब, ग्रामसेवक संघटना अध्यक्ष प्रदीप नारकर, विस्तार अधिकारी संजय ओरोसकर, गजानन धरणे, पशु वैद्यकीय अधिकारी अभिजीत कसालकर, गट शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 कार्यक्रमात नवनिर्वाचित सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य: दादा साईल, रुपेश पावसकर, दीपलक्ष्मी पडते, नागेश आईर, सुप्रिया वालावलकर, दीपक नारकर, गंगाराम सडवेलकर, रुपेश कानडे, आरती पाटील.

पंचायत समिती सदस्य: मंगेश प्रभू, बाळकृष्ण मढव, अर्चना बंगे, संतोष कांदळकर, ममता राऊळ, मिलिंद नाईक, योगेश धुरी, सीताराम तेली, नितीन महाडेश्वर, करुणा पावसकर, श्रावणी तेरसे, निखिल कांदळगावकर, प्रियांका दळवी, अर्चना घावनळकर, अश्विनी सावंत, दिव्यांगी खरात, अमित भोगले, दीप्ती नाईक.

 तालुक्यात ३,५०० घरकुले मंजूर आहेत, ती पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, असे आवाहन बीडीओ वालावलकर यांनी केले. गेल्या चार वर्षांत प्रशासकीय राजवटीमुळे ग्रामपंचायतींची अनेक कामे थांबली आहेत, नवनिर्वाचित सदस्यांमुळे आता या कामांना गती मिळेल, असा विश्वास राजन परब यांनी व्यक्त केला.

दर्जेदार शिक्षण, आरोग्य सेवा आणि बेरोजगारी निर्मूलनासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज दादा साईल यांनी व्यक्त केली. पंचायत समितीची नवीन इमारत, पत्रकार कक्ष आणि सरपंच संघटना कार्यालयासाठी पालकमंत्री व आमदारांच्या माध्यमातून प्रयत्न करू, असे रुपेश कानडे यांनी सांगितले.

नेरूर मतदारसंघाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यावर भर देणार असल्याचे रुपेश पावसकर यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश परब यांनी केले.