'ते' बॅनर तात्काळ हटवले !

मायकल डिसोजांचाही खुलासा
Edited by: विनायाक गांवस
Published on: February 12, 2026 20:08 PM
views 231  views

सावंतवाडी : भाजपचे बंडखोर आणि अपक्ष कोलगाव जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांचे शहरातील ते बॅनर तात्काळ हटविण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा यावर 'किंगमेकर' असा उल्लेख करण्यात आला होता. त्यातच या बॅनरशी आपला संबंध नसल्याचा खुलासा श्री. डिसोजा यांनी केला. त्यामुळे हे बॅनर लावले कुणी ? अन् काढले कुणी ? हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला आहे. शहरात लावण्यात आलेले 'ते' वादग्रस्त बॅनर काही तासांतच हटवण्यात आलेत. यावर मायकल डिसोजा यांचा वडीलांचा प्रेरणास्थान व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा किंगमेकर असा उल्लेख करण्यात आला होता. परंतु, काही तासांत हे बॅनर हटविण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा खुलासा डिसोजा यांनी केला. आपल्याला या बॅनरबाबत कल्पना नाही. कार्यकर्त्यांकडून बॅनर लावण्यात आले असण्याची शक्यता आहे. माझ्याकडून हे बॅनर लावण्यात आलेले नाहीत. ज्यांनी बॅनर लावलेत त्यांच्याकडून ते हटविण्यात यावेत अशी प्रतिक्रिया भाजपचे बंडखोर तथा अपक्ष कोलगाव जिल्हा परिषद सदस्य ॲड मायकल डिसोजा यांनी दिली.  

त्यानंतर तात्काळ हे बॅनर हटविण्यात आले. मात्र, हे बॅनर नगरपरिषदेकडून हटविण्यात न आल्याचे समजते. नगरपरिषद समोरच यातील एक बॅनर होता. मात्र, येथील कर्मचाऱ्यांना विचारलं असता याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बॅनर लावण्याची अधिकृत परवानगी घेतली होती का ? ते बॅनर कुणी लावले ? लावलेले कुणी काढले ? आदी सवाल आता उपस्थित राहू लागले आहेत.