
कणकवली : राज्याच्या वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा पालकमंत्री नितेश राणे यांनी सादर केला. जिल्ह्यात सध्या सुरू असलेली कामे तसेच आगामी काळात प्रस्तावित विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती यावेळी मांडण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्याविकासाच्या गरजा लक्षात घेता पायाभूत सुविधा, पर्यटनविकास, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण भागातील रस्ते व जलसंधारण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी जिल्हा नियोजन निधीत भरीव तरतूद करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री राणे यांनी केली. प्रस्तावित निधीमुळे जिल्ह्यातील प्रलंबित कामांना गती मिळून सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या बैठकीस मंत्री उदय सामंत, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जैसवाल, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.












