
कुडाळ: झाराप ग्रामपंचायतीतील राजकीय सत्तासंघर्ष आज अक्षरशः शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळाले. सरपंच दक्षता मेस्त्री यांच्यावरील अविश्वास ठरावाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर, मेस्त्री या आपला पदभार पुन्हा स्वीकारण्यासाठी आज ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाल्या होत्या. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा थेट स्थगिती आदेश हातात असूनही त्यांना ग्रामपंचायतीत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्याने काही काळ तीव्र तणाव आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सरपंच दक्षता मेस्त्री या कार्यालयात आल्यानंतर, “गटविकास अधिकाऱ्यांचे (BDO) लेखी आदेश आल्याशिवाय सरपंचांची केबिन उघडणार नाही,” अशी ठाम भूमिका प्रशासकीय पातळीवर किंवा विरोधी गटाकडून घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असतानाही केवळ लेखी पत्राच्या तांत्रिक कारणावरून सरपंचांना थांबवून ठेवण्यात आल्याने ग्रामपंचायत परिसरात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले.
या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कुडाळचे गटविकास अधिकारी मनोज भोगटे यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्यात आला. त्यावेळी, “जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश लागू आहे, त्यामुळे सरपंचांना तात्काळ केबिन उघडून द्या,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिल्याची माहिती समोर आली. परंतु, "माझ्याकडे प्रत्यक्ष लेखी आदेश हातामध्ये नसताना मी याची जबाबदारी घेणार नाही," अशी भूमिका संबंधित यंत्रणेने मांडल्याचे समजते. त्यामुळे फोनवरील निर्देशानंतरही पेच सुटू शकला नव्हता.
झाराप ग्रामपंचायतीतील वाढता तणाव आणि कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अखेर गटविकास अधिकारी मनोज भोगटे यांनी स्वतः तात्काळ झाराप ग्रामपंचायत कार्यालयात धाव घेतली. बीडीओ भोगटे स्वतः उपस्थित राहिल्यानंतर अखेर सरपंच दक्षता मेस्त्री यांच्यासाठी केबिनचे दरवाजे उघडण्यात आले यावेळी पंचायत समिती उपसभापती सिताराम तेली हे देखील उपस्थित होते. यानंतर मेस्त्री यांनी कायदेशीररित्या पुन्हा एकदा सरपंचपदाचा अधिभार स्वीकारत आपले सर्व अधिकार ताब्यात घेतले.
या संपूर्ण नाट्यमय घडामोडींमुळे झारापमधील राजकीय संघर्ष आता अधिकच तीव्र आणि टोकदार बनला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्थगितीनंतर सरपंच दक्षता मेस्त्री यांनी खुर्ची तर मिळवली आहे, मात्र या प्रकरणावर लवकरच अंतिम खटला दिनांक 2 जून रोजी चालणार आहे. त्यामुळे नेमका काय निकाल लागतो आणि झारापच्या सत्तेची ऊठबस कुठे थांबते, याकडे आता संपूर्ण कुडाळ तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.










