LIVE UPDATES

BDO, सभापती - उपसभापतींच्या दालनातील AC काढून टाका

महेश जुवाटकरांनी ठेवलं नियमावर बोट
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 20, 2026 21:38 PM
views 64  views

मालवण : मालवण पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकारी (BDO) तसेच पंचायत समिती सभापती व उपसभापती यांच्या दालनात बसवण्यात आलेली वातानुकूलित (एसी) यंत्रणा तात्काळ काढून टाकावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश जुवाटकर यांनी केली आहे. शासनाच्या नियमांनुसार संबंधित पदाधिकाऱ्यांना वातानुकूलित दालनाची सुविधा अनुज्ञेय नसल्याचा दावा करत गटविकास अधिकाऱ्यांना तसे मागणीचे पत्र दिले आहे.

जुवाटकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार राज्यातील ज्या शासकीय अधिकाऱ्यांचे किमान वेतन रु. १८,४०० किंवा त्यापेक्षा अधिक होते, अशा अधिकाऱ्यांच्या दालनांना वातानुकूलित सुविधा देण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन बँड रु. ३७,४०० ते ६७,००० व ग्रेड वेतन रु. १०,००० किंवा त्यापेक्षा अधिक असलेल्या अधिकाऱ्यांच्या दालनांना वातानुकूलित सुविधा देण्यास अनुज्ञेयता देण्यात आली.

सातव्या वेतन आयोगानुसारही वेतन स्तर ३० (रु. १,४४,२०० ते २,१८,२००) किंवा त्यापेक्षा अधिक वेतनश्रेणीतील उच्च अधिकाऱ्यांनाच वातानुकूलित यंत्रणा बसविण्याची सुविधा मंजूर असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकारी, सभापती व उपसभापती यांच्या दालनातील वातानुकूलित यंत्रणा शासन नियमांच्या चौकटीत बसत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यामुळे संबंधित कार्यालयातील सध्या सुरू असलेली वातानुकूलित यंत्रणा तात्काळ बंद करून ती काढण्यात यावी, अशी मागणी केली आहे.