
देवगड : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत मिठबाव येथील फाटकवाडा शाळेमध्ये रविवारी पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ एका आगळ्यावेगळ्या आणि भावनिक क्षणाचा साक्षीदार ठरला. देवगड पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके यांनी आपल्या नातू युग प्रकाश जाधव याला पोलिओ लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेची औपचारिक सुरुवात केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी मेस्त्री, आशा सेविका सायली नरे, अंगणवाडी सेविका तसेच माताभगिनी - पालक उपस्थित होते.
उपसभापती अमोल लोके म्हणाले, "आज माझा नातू युगला तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःच्या हस्ते पोलिओचा पहिला डोस पाजण्याचा आणि त्याच वेळी या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्याचा दुहेरी आनंद मला लाभला आहे. प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजून या राष्ट्रीय मोहिमेत सहभाग घ्यावा."असे लोके यांनी सागितले.
याप्रसंगी उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांनी पोलिओमुक्त भारतासाठी प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचविण्याचे आवाहन केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.










