
पेडणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली १२ वर्षे कथ्थक नृत्याची समृद्ध परंपरा जोपासणारे ‘नृत्यांगण कथ्थक क्लासेस’ आता गोवा राज्यातील पेडणे येथे सुरू झाले आहेत. नुकतेच नटराज पूजन करून या नवीन शाखेचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या नृत्यवर्गांच्या संचालिका व मार्गदर्शिका नृत्य विशारद सौ. काश्मिरा रुजूल पाटणकर या विद्यार्थ्यांना कथ्थक नृत्याचे शास्त्रशुद्ध आणि दर्जेदार प्रशिक्षण देणार आहेत. 'नृत्यांगण कथ्थक क्लासेस’च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस, कुडाळ, माणगाव, बांदा आणि सावंतवाडी येथे शाखा यशस्वीपणे कार्यरत आहेत. तसेच ‘स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल’मधील विद्यार्थ्यांनाही त्यांच्यामार्फत कथ्थकचे प्रशिक्षण दिले जाते.
गेल्या १२ वर्षांपासून या संस्थेचा परीक्षांमधील निकाल सलग १०० टक्के लागला असून अनेक विद्यार्थ्यांनी नृत्यक्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सिंधुदुर्गातील या यशस्वी वाटचालीनंतर आता गोव्यातील बालकांना आणि नृत्यप्रेमींना कथ्थकचे शास्त्रीय शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या वर्गांमधून विद्यार्थ्यांना कथ्थक नृत्याचे सर्वांगीण आणि शास्त्रशुद्ध शिक्षण दिले जाणार आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या मान्यताप्राप्त ‘प्रारंभिक’ परीक्षेपासून ते ‘विशारद पूर्ण’ परीक्षेपर्यंतच्या सर्व स्तरांसाठी आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शन येथे उपलब्ध करून दिले जाणार आहे.











