
दोडामार्ग : तिलारी धरण परिसरा लगत जुने शिरंगे हद्दीत सुरू असलेल्या काळ्या दगडाच्या खाणी कायमस्वरूपी बंद कराव्यात, या मागणीसाठी सुरू असलेले खानयाळे ग्रामस्थांचे साखळी उपोषण सातव्या दिवशीही सुरू होते. गोवा राज्याच्या जलस्त्रोत विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी शिरंगे येथे जात खाणींची पाहणी करत खाणींबाबत आश्चर्य व्यक्त केले.
तिलारी धरणालगत शिरंगे हद्दीत काळ्या दगडाचे सुरू असलेले उत्खनन कायमस्वरूपी बंद करावे, या मागणीसाठी खानयाळे ग्रामस्थांनी येथील शीव परिसरात गुरुवारपासून साखळी उपोषणा सुरुवात केली. मात्र ,उपोषणकर्त्यांची मागणी पूर्ण करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने उपोषण चालू ठेवण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. या उपोषणाला महसूल व जलसंपदा विभागाचे अधिकारी भेट देऊन उपोषणकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, उपोषणकर्ते खाणी कायमस्वरूपी बंद करा या मतावर ठाम राहिल्याने हे उपोषण सातव्या दिवशी सुरू आहे.
तिलारी धरण परिसरात उत्खनन करणे हे धोक्याचे आहे. तेथे मोठमोठे तुरुंग स्फोट होत असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे लवकरच जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांमार्फत येथील वस्तुस्थितीची पाहणी करून चौकशी केली जाणार असल्याचे गोवा राज्याचे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार या विभागाचे काही अधिकाऱ्यांनी बुधवारी तिलारी परिसरात असलेल्या काळ्या दगडांच्या खाणींना भेट दिली. तेथील वस्तुस्थिती पाहून ते अचंबित झाले. याबाबतचा परिपूर्ण अहवाल सादर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.