LIVE UPDATES

Ganesh Chaturthi 2026 : कोकणात गणेश मूर्ती रंगकाम अंतिम टप्प्यात

मूर्तिकारांची वाढली लगबग
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 11, 2026 20:21 PM
views 44  views

सावंतवाडी : कोकणातील सर्वात मोठ्या आणि उत्साहपूर्ण सणांपैकी एक असलेल्या गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश चित्रशाळांमध्ये लगबग वाढली आहे. गणेशमूर्तींचे रंगकाम आता अंतिम टप्प्यात आले असून, मूर्तिकार आणि कारागीर दिवसरात्र मेहनत घेताना दिसत आहेत.

यंदा मातीच्या गणेशमूर्तींना विशेष मागणी असल्याचे चित्र आहे. विविध आकारांच्या मूर्तींना आकर्षक रंगसंगती देण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. गणेशमूर्तींच्या डोळ्यांची रंगरंगोटी, वस्त्रांचे रंगकाम तसेच अंतिम सजावटीची कामे पूर्ण करण्यासाठी मूर्तिकार व्यस्त आहेत.

यंदा रंगांच्या किमतीत झालेल्या वाढीचा काहीसा परिणाम गणेशमूर्तींच्या दरावर झाला आहे. महागाईचे सावट असले तरी गणेशभक्तांच्या उत्साहात मात्र कोणतीही कमतरता दिसून येत नाही. आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन उत्साहात करण्यासाठी भाविकांकडून मूर्तींची आगाऊ नोंदणी आणि खरेदी सुरू आहे.

गणेशोत्सव हा कोकणच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याने प्रत्येक घरात बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू झाली असून, गणेश चित्रशाळांमधील वाढलेली लगबग उत्सवाच्या आगमनाची चाहूल देत आहे.