LIVE UPDATES

कणकवलीत अन्न व औषध प्रशासन विभागाची हॉटेल्समध्ये तपासणी

दोन पथके कणकवलीत दाखल : नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाईचा इशारा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 01, 2026 20:01 PM
views 310  views

कणकवली : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी कणकवली शहरातील विविध हॉटेल व चायनीज सेंटरची तपासणी करत अन्नाच्या गुणवत्तेची आणि स्वच्छतेची पाहणी केली. या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये काही काळ खळबळ उडाली.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड तसेच अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या दोन पथकांनी विविध ठिकाणी तपासणी केली. चायनीज पदार्थांमध्ये बंदी असलेले कृत्रिम रंग (चायनीज कलर) वापरले जात आहेत का? तयार करण्यात येणारे अन्न ताजे आहे का? याची सखोल चौकश केली. तसेच स्वयंपाकघरातील स्वच्छता, अन्नसाठवण, वापरल्या जाणाऱ्या साहित्याची गुणवत्ता आणि ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची सुरक्षितता याचीही तपासणी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी हॉटेल चालकांना स्वच्छतेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना दिल्या. ग्राहकांना नेहमी ताजे, सुरक्षित व दर्जेदार अन्नच उपलब्ध करून द्यावे, अन्न सुरक्षा नियमांचे पालन करावे आणि कोणत्याही प्रकारचा कृत्रिम अथवा बंदी असलेला रंग वापरू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत निर्धारित नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित हॉटेल व खाद्य व्यवसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला. या तपासणी मोहिमेमुळे शहरातील खाद्य व्यावसायिकांची धावपळ सुरू असल्याचे पाहायला मिळाले